Join us  

कोहली - रोहित यांनी गाजवले वर्चस्व

काही चुरशीच्या आणि दबावाच्या क्षणांनंतर अखेर भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत निर्विवादपणे वर्चस्व राखले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 5:21 AM

Open in App

- अयाझ मेमन(संपादकीय सल्लागार)काही चुरशीच्या आणि दबावाच्या क्षणांनंतर अखेर भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत निर्विवादपणे वर्चस्व राखले. या मालिकेत प्रामुख्याने छाप पाडली ती विराट कोहली - रोहित शर्मा या जोडीने. त्याचवेळी, आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने आपल्याला आणखी कोणत्या बबतीत सुधारणा करण्याची गरज आहे, हेदेखील या मालिकेतून टीम इंडियाला कळाले. यानिमित्ताने सादर केले आहे भारतीय खेळाडूंचे रिपोर्ट कार्ड...विराट कोहली (१० पैकी ९ गुण) :मालिकेत सर्वाधिक धावा फटकावताना कोहलीने तीन सलग शतके झळकावली. तो जगातील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. विंडीजने एक सामना अनिर्णीत राखल्यानंतर बरोबरी साधली आणि अशा दबावाच्या क्षणी त्याने आक्रमक नेतृत्व करीत भारताचा मालिका विजय मिळवून साकारला.रोहित शर्मा (१० पैकी ८.५) :कोहलीसह रोहित शर्मा भारतीय फलंदाजीचा भक्कम आधार ठरला. त्याने झळकावलेली दोन्ही शतके, खासकरून दुसरे शतक सर्वांत निर्णायक ठरले. कारण या खेळीमुळे मालिका भारताच्या बाजूने झुकली.शिखर धवन (१० पैकी ७) :धवनने प्रत्येक सामन्यात चांगली सुरुवात केली, पण एकूण मालिकेत त्याला ५ सामन्यांत केवळ ११२ धावाच करता आल्या. हे खूप निराशाजनक ठरले. सध्या सलामीवीर म्हणून अनेक पर्याय समोर येत असताना धवनला लवकरच छाप पाडावी लागेल.अंबाती रायुडू (१० पैकी ७) :रायुडूने नक्कीच संघ निवडकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरविला. धवनप्रमाणेच रायुडूने प्रत्येक डावात चांगली सुरुवात केली, पण चौथ्या सामन्यात त्याने शानदार शतक झळकावले. यासह त्याने भारतीय संघातील चौथ्या क्रमांकावर हक्कही मिळवला.रिषभ पंत (१० पैकी २) :मालिकेत एक फलंदाज म्हणून पंतला खेळविण्यात आले. पण ज्या तीन सामन्यांत त्याला संधी मिळाली, तिथे त्याला अपेक्षित छाप पाडता आली नाही. त्याची आक्रमक फटकेबाजी कधीकधी निर्णायक ठरू शकते, पण संघातील स्थान निश्चित करण्यासाठी पंतला सातत्याने मोठी खेळी खेळावी लागेल.

महेंद्रसिंग धोनी (१० पैकी ६) :यष्ट्यांमागे धोनी अप्रतिम आहे यात वाद नाही. पण त्याचे फलंदाजीतील अपयश कायम राहिले. त्याला ५ सामन्यांत केवळ ५० धावा करता आल्या. तो नक्कीच विश्वचषक स्पर्धेत खेळेल, पण त्याचे फलंदाजीतील अपयश चिंतेचा विषय ठरत आहे.भुवनेश्वर कुमार (१० पैकी ४) :भुवीला या मालिकेत लौकिकानुसार मारा करता आला नाही. त्याला वेगवान मारा आणि चेंडू स्विंग करण्यातही यश आले नाही. यामध्ये त्याला पुढे आणखी मेहनत घ्यावी लागेल.युझवेंद्र चहल (१० पैकी ६) :चहलला केवळ ३ सामने खेळण्याची संधी मिळाली; कारण संघव्यवस्थापनाचा तो प्रयोगाचा भाग राहिला. तरी चहलने ५ बळी घेत फिरकी गोलंदाजांमध्ये सर्वांत वरचे स्थान मिळवले.कुलदीप यादव (१० पैकी ७.५) :कुलदीप भारताचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. विंडीजचे फलंदाज त्याच्या मनगटी फिरकीवर आणि राँग वनवर चकले. पण हेटमायर आणि होअप यांनी मात्र त्याचा चांगला सामना केला. दोन सामन्यांत त्यांनी कुलदीपवर हल्लाही चढवला.जसप्रीत बुमराह (१० पैकी ८) :बुमराहने आता भारताचा सर्वांत सुधारणा करणारा आणि सर्वोत्तम गोलंदाज म्हणून स्थान मिळविले आहे. त्याने वेगात मारा करण्यावर चांगला अभ्यास केला असून, प्रतिस्पर्धी फलंदाज अजूनही बुमराहच्या विचित्र शैलीविरुद्ध खेळण्याचे शिकत आहेत.खलील अहमद (१० पैकी ८) :यंदाच्या मोसमात खलील भारतासाठी ‘फाइंड’ ठरला. आशिया चषक स्पर्धेतून मिळालेल्या प्रोत्साहनानंतर त्याने कमालीची सुधारणा केली असून तो सातत्याने बळी घेत आहे. खलीलकडे चेंडू दोन्ही बाजूने स्विंग करण्याची क्षमता आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून भारताच्या आक्रमणामध्ये भर पडली आहे.मोहम्मद शमी आणि उमेश यादव (१० पैकी ३.५) :दोघांनाही छाप पाडण्यात यश आले नाही. दोघांनी वेगवान मारा केला, पण तरीही महागडे ठरले. दोघेही खेळलेल्या सामन्यात परिस्थिती फलंदाजीला पोषक होती, पण शेवटी त्यांच्याकडे अनुभवही फार मोठा आहे.रवींद्र जडेजा (१० पैकी ४.५) :जडेजाचे फलंदाजीतील योगदान कमी राहिले, पण गोलंदाजीत त्याने वर्चस्व राखले. त्याने मालिकेत ७ बळी घेत एकदिवसीय क्रिकेट संघातील आपले महत्त्व दाखवून दिले. तसेच क्षेत्ररक्षणामध्ये नेहमीप्रमाणे जडेजा लक्षवेधी ठरला.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजभारतीय क्रिकेट संघ