- अयाझ मेमन, कन्सल्टिंग एडिटर लोकमतयंदाच्या वर्षात अनेक क्रिकेटपटूंनी चमकदार कामगिरी करत आपली छाप पाडली. त्यामुळेच यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम संघ निवडताना माझीही कसोटी लागली. २०१९चे वर्ष गाजवताना विराट कोहली सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा फटकावणारा फलंदाज ठरला. काही धावांच्याच अंतराने तो रोहित शर्माहून पुढे आहे. त्याचप्रमाणे गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने सर्वाधिक बळी घेतले. रोहितने विश्वचषकात ५ शतके ठोकून नक्कीच शानदार कामगिरी केली आणि यानंतर कसोटीतही जबरदस्त पुनरागमन करताना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५००हून अधिक धावा कुटल्या.पण या तीन खेळाडूंव्यतिरिक्त एका खेळाडूने आपल्या तुफानी कामगिरीच्या जोरावर क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधले. यामुळे मी त्यालाच वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवडले, तो खेळाडू म्हणजे इंग्लंडचा बेन स्टोक्स. २०१८ साली एका नाइटक्लबमध्ये केलेल्या गैरवर्तनानंतर स्टोक्सच्या संयमावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र या घटनेनंतर त्याच्या कारकिर्दीला वेगळे वळण लागले. बंदीची शिक्षा भोगून पुनरागमन केलेल्या स्टोक्सने यानंतर क्रिकेटविश्व अक्षरश: गाजवले. त्याने विश्वचषक आणि अॅशेस मालिकेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्याने अल्पावधीतच क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये स्वत:ची जागा निर्माण केली.विश्वचषक अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या सुपर ओव्हरमध्ये निर्णायक कामगिरी करत स्टोक्सने इंग्लंडच्या पहिल्या विश्वविजेतेपदात मोलाचे योगदान दिले. यानंतर अॅशेस मालिकेतील हेडिंग्ले सामन्यात अद्भूत शतकी खेळी करताना त्याने इंग्लंडला रोमांचक विजय मिळवून दिला. या एका खेळीमुळे संपूर्ण मालिकेचा थरार उंचावला हे विशेष.स्टोक्स, कोहली आणि रोहित यांना तिन्ही प्रकारच्या क्रिकेट संघांत स्थान मिळाले. याशिवाय अन्य एका खेळाडूची तिन्ही संघांत निवड झाली असून तो खेळाडू म्हणजे पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम. त्याने यंदा आॅस्टेÑलियात आणि घरच्या मैदानावर शतकी तडाखा दिला. माझ्या कसोटी संघात तो बारावा खेळाडू आहे. गोलंदाजांमध्ये कमिन्स तिन्ही संघांत स्थान मिळवण्यात थोडक्यात चुकला. एकदिवसीय संघात त्याची जागा आॅस्टेÑलियाच्याच मिचेल स्टार्क याने घेतली. विश्वचषक स्पर्धेत स्टार्क तुफान खेळला. भारताचा जसप्रीत बुमराह दुर्दैवाने दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे कसोटी संघात त्याला स्थान मिळाले नाही, पण त्याच वेळी एकदिवसीय आणि टी२० संघात मात्र त्याची निवड झाली आहे.दुसरीकडे स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झालेले पुनरागमन आॅस्टेÑलियासाठी बुस्ट ठरले. दोघांनी कसोटी क्रिकेट सहजपणे गाजवले. याशिवाय मार्नस लाबुशने सरप्राईज पॅकेज ठरला. अॅशेस मालिकेत त्याची राखीव खेळाडू म्हणून निवड झाली होती आणि त्यानंतर कमी वेळात मुख्य संघात आपले स्थान भक्कम केले.कर्णधार म्हणून मी विराट कोहली (कसोटी), इयॉन मॉर्गन (एकदिवसीय) आणि रोहित शर्मा (टी२०) यांची निवड केली आहे.कसोटी संघ : रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, मार्नस लाबुशने, स्टीव्ह स्मिथ, विराट कोहली (कर्णधार), बेन स्टोक्स, क्विंटन डीकॉक (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, पॅट कमिन्स, कागिसो रबाडा व मोहम्मद शमी. बाबर आझम (१२वा खेळाडू).एकदिवसीय संघ : रोहित शर्मा, शाय होप (यष्टीरक्षक), विराट कोहली, बाबर आझम, इयॉन मॉर्गन (कर्णधार), शाकिब अल हसन, बेन स्टोक्स, मिचेल स्टार्क, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह. राशिद खान (१२वा खेळाडू).टी२० संघ : रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, बाबर आझम, विराट कोहली, अॅरोन फिंच, बेन स्टोक्स, पॅट कमिन्स, ख्रिस जॉर्डन, राशिद खान, युझवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराह. ग्लेन मॅक्सवेल (१२वा खेळाडू).
- Cricket Buzz»
- बातम्या»
- सरत्या वर्षात कोहली, रोहित, स्टोक्स, बाबर ठरले लक्षवेधी
सरत्या वर्षात कोहली, रोहित, स्टोक्स, बाबर ठरले लक्षवेधी
२०१९चे वर्ष गाजवताना विराट कोहली सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा फटकावणारा फलंदाज ठरला. काही धावांच्याच अंतराने तो रोहित शर्माहून पुढे आहे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 1:33 AM