वेलिंग्टन : न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने फिटनेस मिळवण्यासाठी घाई केली नाही, पण शुक्रवारपासून येथे प्रारंभ होत असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेदरम्यान तो भारतीय कर्णधार विराट कोहलीला बाद करीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमन संस्मरणीय ठरविण्यास उत्सुक आहे.
आॅस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीमध्ये त्याचा हात फ्रॅक्चर झाला होता. त्यानंतर त्याचा भारताविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेत संघात सहभाग नव्हता. सहा आठवडे संघाबाहेर राहिल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या या वेगवान गोलंदाजाने पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी आपले प्राधान्य कशाला राहील, हे स्पष्ट केले. पहिल्या कसोटीसाठी येथे दाखल झाल्यानंतर त्याने भारतीय कर्णधाराला इशारा देण्याच्या अंदाजात म्हटले की, ‘ज्यावेळी मी खेळतो त्यावेळी माझा प्रयत्न त्याच्यासारख्या (कोहली) फलंदाजाला बाद करीत स्वत:ला सिद्ध करण्याची असते. मी त्याला बाद करण्याची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे. पण, तो शानदार खेळाडू आहे. तो महान खेळाडू असल्याची सर्वांना कल्पना आहे.’ न्यूझीलंडला गेल्या मालिकेत आॅस्ट्रेलियाने ३-० ने पराभूत केले होते आणि भारतही त्यांच्यापुढे खडतर आव्हान सादर करेल.