नवी दिल्ली : भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या इंग्लंड दौऱ्याच्या तयारीला धक्का बसला आहे. कारण तो मानेच्या दुखापतीमुळे कौंटी क्रिकेटला मुकणार आहे. बीसीसीआयने गुरुवारी कोहली कौंटी क्रिकेट खेळणार नसल्याचे स्पष्ट केले असून कोहलीला दुखापतीतून सावरण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी लागणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले.
कोहलीची तंदुरुस्ती चाचणी १५ जून रोजी होणार असून त्यानंतर ब्रिटन दौºयातील मर्यादित षटकांच्या सामन्यांतील सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तो उपलब्ध राहील किंवा नाही, हे निश्चित होईल. या दौºयाची सुरुवात जूनच्या अखेरच्या आठवड्यात आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यासह होणार आहे. भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या मालिकेची सुरुवात टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याने करणार असून त्याची सुरुवात जुलैच्या सुरुवातीच्या आठवड्यात होईल.
बीसीसीआयचे कार्यवाहक सचिव अमिताभ चौधरी म्हणाले की,‘रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू व सनरायझर्स हैदराबाद संघांदरम्यान १७ मे रोजी खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या ५१ व्या लढतीदरम्यान भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या मानेला दुखापत झाली होती. कोहलीला जून महिन्यात सरेतर्फे खेळायचे होते, पण आता त्याला कौंटी क्रिकेटमध्ये सहभागी होता येणार नाही. बीसीसीआयची वैद्यकीय समिती, स्कॅन व स्पेशालिस्टच्या सल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.’ (वृत्तसंस्था)
भारतीय कर्णधार आता बीसीसीआयच्या वैद्यकीय समितीच्या मार्गदर्शनाखाली रिहॅबिलिटेशन प्रक्रियेला सामोरा जाणार आहे. तो सराव सुरू करेल आणि त्यानंतर १५ जून रोजी बेंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याची फिटनेस चाचणी होईल. चौधरी पुढे म्हणाले, ‘कोहली आयर्लंड व इंग्लंडमध्ये भारताच्या आगामी दौºयापूर्वी फिट होईल, असा बीसीसीसीआयच्या वैद्यकीय समितीला विश्वास आहे.’
कौंटी क्रिकेट खेळण्यासाठी कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध बेंगळुरूमध्ये १४ जूनपासून प्रारंभ होत असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतला होता.
कोहलीला चाचणीसाठी मुंबईतील एका रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्याला स्लिप डिस्कचा त्रास असून तो भारतीय संघाच्या इंग्लंड दौºयापूर्वी सरेतर्फे कौंटी क्रिकेट खेळू शकणार नसल्याचे वृत्त आले.मात्र, बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने स्पष्ट केले की, त्याच्या मानेला दुखापत झाली असून त्याला स्लिप डिस्कचा त्रास नाही.
व्यस्त वेळापत्रक...
गेल्या वर्षभरात कोहली क्रिकेटमध्ये व्यस्त आहे. कोहलीने या कालावधीत ९ कसोटी सामने खेळले व राष्ट्रीय संघाच्या ३२ पैकी २९ वन-डे सामन्यात सहभाग नोंदवला. त्याने भारतातर्फे १८ पैकी ९ टी-२० सामनेही खेळले. त्याने या कालावधीत एकूण ४७ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. कोहलीपेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने केवळ रोहित शर्मा व हार्दिक पांड्या (प्रत्येकी ४८ सामने) यांनी खेळले आहेत.या व्यतिरिक्त कोहलीने यंदाच्या मोसमात आयपीएलमध्ये १४ सामने खेळले. त्यामुळे त्याच्या सामन्यांची एकूण संख्या ६१ झाली आहे. कोहलीला आयपीएलच्या काही लढतींमध्ये विश्रांती का देण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होतो.
Web Title: Kohli will lose county cricket; The fitness test will be done on June 15
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.