मुंबई : भारतीय क्रिकेट संघाला पुढील वर्षी दोन देशांचा दौरा करायचा आहे. या दौ-याआधी काही प्रमुख फलंदाजांना विश्रांती दिली जाईल, अशी माहिती कर्णधार विराट कोहलीने दिली.
न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध मायदेशात मालिका आटोपल्यानंतर जानेवारीत भारतीय संघ द. आफ्रिकेकडे रवाना होईल. तेथे तीन कसोटी, सहा वन-डे आणि तीन टी-२० सामने खेळले जातील. द. आफ्रिकेनंतर भारतीय संघ इंग्लंडला रवाना होणार असून, या दौ-यात तीन टी-२०, तीन वन-डे आणि पाच कसोटी सामने होणार आहेत. ही मालिका जुलै २०१८ पासून सुरू होईल.
आम्ही केवळ फलंदाजांना नव्हे, तर येत्या काही आठवड्यांत गोलंदाजांबाबतही रोटेशनचे धोरण अवलंबणार आहोत. यामुळे प्रत्येक खेळाडू विदेश दौ-यात ताजातवाना राहू शकेल, असे कोहलीने सांगितले. तो म्हणाला, ‘रोटेशन वेळापत्रकावर आम्ही चर्चा केली. वेळापत्रक व्यस्त असल्यामुळे खेळाडू दुखापतग्रस्त होऊ नयेत, थकू नयेत म्हणून रोटेशननुसार विश्रांती देण्याचा संघव्यवस्थापनाचा विचार आहे.’
न्यूझीलंडचे उदाहरण देत कोहली म्हणाला, की हा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर क्रिकेटपासून अलिप्त होता. त्यांच्या खेळाडूंना विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळाला. मोठ्या स्पर्धा खेळताना यामुळे फार फरक पडतो. वेगवान गोलंदाजांना यशस्वी कामगिरीसाठी विश्रांतीची फार गरज असते. त्यामुळेच आम्ही सध्याच्या मालिकेतून उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती दिली. कसोटी मालिकेआधी हे दोन्ही गोलंदाज ताजेतवाने व्हावेत, हाच यामागे हेतू आहे.’
>नव्या नियमांमुळे खेळ रोमांचक
मुंबई : वन-डे क्रिकेटमधील नव्या नियमांमुळे खेळ अधिक रोमांचक आणि व्यावसायिक बनल्याचे मत कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले आहे. भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध नव्या नियमांनुसार प्रथमच मैदानावर उतरणार आहे. पत्रकारांशी संवाद साधताना विराट म्हणाला, ‘‘काही नियम फारच क्लिष्ट आहेत. फलंदाज क्रिझमध्ये दाखल झाल्यानंतरही बॅट हवेत राहिली तरी तो नाबाद ठरेल.
याशिवाय डीआरएसमध्ये मैदानी पंचाचा नियम आणि कॅचचा नियमदेखील रोमांचक आहे. यामुळे मैदानावर अनेक गोष्टींचा बारीक विचार करायला भाग पडत आहे. डीआरएसअंतर्गत आता पायचितचा निर्णय पंचांच्या विरोधात गेला तरी संघ रिव्ह्यू गमविणार नाही.
खेळाडूंच्या असभ्य वर्तनावर रेड कार्ड दाखविण्याचा अधिकार पंचांना देण्यात आला आहे. बॅटची जाडी आणि वजन यावर निर्बंध आले आहेत.’’
कोहलीचा आज २०० वा वन-डे असेल. संघासाठी रँकिंगचे महत्त्व नसल्याचे सांगून कोहली पुढे म्हणाला, ‘‘हा आकड्यांचा खेळ आहे. एखादा संघ सरस खेळत असेल तर कमीअधिक होत राहणार.’’
Web Title: Kohli will return to the top of the batting order: Kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.