नागपूर : क्रिकेटप्रेमींचा विश्वास बसणार नाही, पण विराट कोहली स्वत:च्या नेतृत्वात आयसीसी किंवा टी-२० विश्वचषक तीनवेळा जिंकून देईल, असे भाकीत नागपूरचे ज्योतिषी आणि क्रिकेट प्रशंसक नरेंद्र बुंदे यांनी केला आहे. भारतीय संघाचा सुवर्णकाळ सुरू झाल्याची माहितीदेखील त्यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
सचिन तेंडुलकरबद्दल केलेली सातही भाकिते खरी ठरली असून, अशी भाकिते करणारी जगातील आपण पहिलीच व्यक्ती असल्याचा दावादेखील बुंदे यांनी केला. सचिन टेनिस एल्बोच्या जखमेतून यशस्वी पुनरागमन करणार, वन डेत पहिली द्विशतकी खेळी करणार, २०११ चा विश्वचषक खेळणार, २०१२ मध्येच शतकांचे शतक नोंदविणार, २०१२ मध्येच निवृत्ती जाहीर करणार तसेच सचिनला ‘भारतरत्न’ मिळणार ही ती सर्व भाकिते होती. ही भाकिते वेळोवेळी वृत्तपत्रे तसेच टीव्हीवरील चर्चेत केल्याचे सांगून दाव्याच्या समर्थनार्थ पुरावेदेखील बुंदे यांनी सादर केले.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा कन्या राशीत मोडतो. तो भारताच्या उत्कृष्ट कर्णधारांपैकी एक असून, त्याच्या नेतृत्वात भारताला तीन विश्वचषक जिंकता येतील, असा बुंदे यांनी दावा केला. २०१८ हे वर्ष कोहलीसाठी ‘लकी’ असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, ‘आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड अशा तगड्या संघांविरुद्धदेखील कोहली कसोटी मालिका जिंकून देईल.’
बॉलिवूड स्टार प्रीती झिंटा हिच्या आयपीएलमधील किंग्स इलेव्हन पंजाब संघाच्या यशासाठी आपण संघाचे टी-शर्ट बदलायला लावले होते. त्यानंतरच हा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता, असा दावा करीत टीम इंडियाचे फलंदाजी कोच संजय बांगर यांच्याबाबत केलेली भाकितेही तंतोतंत खरी ठरल्याचे बुंदे यांनी सांगितले. क्रिकेटची ‘काळी बाजू’ असलेल्या मॅच फिक्सिंग किंवा सट्टेबाजीबद्दल कधीही अंदाज व्यक्त केला नाही किंवा कुणाला मदतही केली नाही, असे बुंदे यांनी यासंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
>विराट-अनुष्काचा विवाह पुढच्या वर्षी
विराट आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यातील प्रेम जगजाहीर आहे. सध्याच्या श्रीलंका दौºयातही अनुष्का विराटला भेटायला गेली. या पार्श्वभूमीवर बुंदे यांनी विराट-अनुष्का २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याचा दावा केला आहे. याशिवाय २०२५ पर्यंत विराट हा सचिनचे बरेचशे विक्रम मोडीत काढेल, असेही भाकीत त्यांनी केले.
>कोहलीसाठी २०१८ वर्ष लकी...
कोहली तीन विश्वचषक
जिंकून देईल.
पुढच्या वर्षी अनुष्का शर्मासोबत विवाहबद्ध होणार.
२०१८ हे वर्ष कोहलीसाठी ‘लकी’ ठरणार.
भारतीय संघ आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या भक्कम संघांविरुद्ध कसोटी मालिका जिंकेल.
विराट २०२५ पर्यंत सचिनचे बरेचशे विक्रम मोडीत काढेल.
२०१९ च्या विश्वचषकात महेंद्रसिंह धोनी भारताचे प्रतिनिधित्व करेल.
Web Title: Kohli will win three World Cups
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.