सेंच्युरियन - आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या वन-डेत क्रिकेटमधील एक अजब निर्णय पाहायला मिळाला. भारतीय संघाला 19 षटकानंतर जिंकायला केवळ दोन धावा हव्या असताना मैदानावरील पंचांनी लंच ब्रेकचा निर्णय घेतला. या निर्णयाने संपूर्ण क्रिकेटविश्व आश्चर्यचकित झाले आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण डाव 32.2 षटकांत संपल्यामुळे पंचांनी भारताला डावानंतर घेतलेला ब्रेक घेऊ न देता सरळ फलंदाजीला बोलावले. जेव्हा पंचांनी लंच ब्रेक घोषित केला त्यापूर्वी भारताला 20 मिनिटांत 20 धावा बनवायच्या होत्या परंतु भारत 18 धावाच बनवू शकला. त्यामुळे पंचांनी नियमावर बोट ठेवत लंच ब्रेकचा निर्णय घेतला. यावेळी कर्णधार कोहलीसह सर्वच मैदानातील उपस्थित चांगलेच वैतागलेले दिसले. अनेक प्रेक्षक सरळ मैदान सोडून घरी जाताना दिसले. यावेळी कोहलीने अलीम दार यांना सामना सुरु करण्यासाठी विनंती केली परंतु ती त्यांनी फेटाळून लावली. यामुळे खेळ मात्र ४५ मिनिटांनी लांबला. परंतु यावेळी पंचांनी खेळ 15 मिनिटांनी पूर्वीच लांबवला होता असेही सांगितले जात आहे.
यावेळी समालोचकांनीही या निर्णयावर जोरदार टीका केली. स्टुपिड, अनकॉमन, रेडिक्युलस असे शब्द यावेळी समालोचक या निर्णयाबद्दल वापरताना दिसले. यावेळी हर्षा भोगले यांनी हे हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. याबद्दल सोशल माध्यमांवरही अनेकांनी या निर्णयावर टीका केली.
दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना भारतीय फिरकी गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचा 118 धावांत खुर्दा केला. त्यानंतर फलंदाजी करताना कोहली-धवनने संयमी फलंदाजी करत भारताला विजयासमिप नेहलं. सलामिवीर रोहित शर्मा 15 धावांवर बाद झाला. त्यानंतर कोहली आणि शिखरनं दुसऱ्या विकेटसाठी भागिदारी करत भारताला एकहाती विजयाजवळ नेहलं. धवनने अर्धशतक करत वियात मोलाचा वाटा उचलला.
दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करताना भारतीय फिरकीसमोर सपशेल लोटांगण घेतलं. यजुवेंद्र चहल आणि कुलदीपनं आफ्रिकेच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. चहल-कुलदीप या फिरकी जोडीनं आफ्रिकेच्या आठ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. चहलनं पाच तर कुलदीपनं तीन विकेट घेतल्या. फिरकी माऱ्यापुढे खेळताना आफ्रिकेच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्याचे पहायला मिळाले. युझवेंद्र चहल वनडे सामन्यात सेंच्युरियन मैदानात 5 विकेट घेणारा पहिला खेळाडू ठरला. भुवनेश्वर आणि बुमराहनं प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. आफ्रिकेच्या सहा फलंदाजांना दोन आकडी धावसंख्याही पार करता आली नाही. 32.2 षटकांत दक्षिण आफ्रिकेचा डाव 118 धावांत संपुष्टात आला.