दुबई : भारतीय कर्णधार विराट कोहलीने आयसीसी वन-डे क्रमवारीतील अव्वल स्थान मजबूत करताना कारकिर्दीतील सर्वोत्तम ९११ मानांकन गुण मिळवले आहेत तर कुलदीप यादवने सहाव्या स्थानासह गोलंदाजांच्या यादीत अव्वल १० मध्ये स्थान मिळवले.भारताला मंगळवारी तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेत १-२ ने पराभव स्वीकारावा लागला. कोहलीने मालिकेत ७५, ४५ आणि ७१ अशा खेळी केल्या. त्यात त्याला केवळ दोन मानांकन गुणांचा लाभ झाला, पण ९११ मानांकन गुणांपर्यंत पोहचण्यासाठी ते पुरेसे ठरले. मार्च १९९१ मध्ये आॅस्ट्रेलियाच्या डीन जोन्सने ९१८ मानांकन गुण मिळवले होते. वन-डे क्रमवारीत कुठल्या फलंदाजाने मिळवलेले हे सर्वाधिक मानांकन गुण आहेत.कुलदीपने कारकिर्दीत प्रथमच अव्वल १० गोलंदाजांमध्ये स्थान मिळवले. त्याने मालिकेत ९ बळी घेतले. कुलदीपला आठ स्थानांचा लाभ झाल्मुळे त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम सहाव्या स्थानी झेप घेतली.कुलदीप अव्वल १० मध्ये स्थान मिळवणारा तिसरा भारतीय गोलंदाज व पाचवा फिरकीपटू आहे. भारताचा जसप्रीत बुमराह अव्वल स्थानी असून लेग स्पिनर यजुवेंद्र चहल १० व्या स्थानी आहे. या क्रमवारीत अन्य फिरकीपटूंमध्ये राशिद खान (२), इम्रान ताहिरी (७) व आदिल राशिद (८) यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)>सलग दोन शतक झळकाविणारा इंग्लंडचा फलंदाज जो रुट फलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी दाखल झाला आहे. रुटने पाकिस्तानचा बाबर आजम, भारताचा रोहित शर्मा, आॅस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर आणि न्यूझीलंडचा रॉस टेलर यांना पिछाडीवर सोडत कारकिर्दीतील सर्वोत्तम दुसरे स्थान पटकावले.रुटने या मालिकेत ३, नाबाद ११३ आणि नाबाद १०० अशा खेळी केल्या. त्याने ३४ मानांकन गुणांची कमाई केली. तो कोहलीच्या तुलनेत ९३ मानांकन गुणांनी पिछाडीवर आहे. इंग्लंडचा जेसन रॉय एका स्थानाच्या लाभासह १९ व्या तर कर्णधार इयोन मॉर्गन दोन स्थानांच्या लाभासह २२ व्या स्थानी आहे.इंग्लंडचा वेगवान गोलंदाज लियाम प्लंकेट एका स्थानाच्या लाभासह २० व्या, मार्क वुड दोन स्थानांच्या लाभासह कारकिर्दीतील सर्वोत्तम २६ व्या आणि डेव्हिड विली ११ स्थानांच्या लाभासह ३१ व्या स्थानी आहे.अव्वल पाच अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत बदल झालेले नाही. त्यात बांगलादेशचा साकिब-अल-हसन अव्वल स्थानी आहे. संघाच्या मानांकनामध्ये इंग्लंड एका गुणाच्या लाभासह (१२७ मानांकन) अव्वल स्थानी कायम आहे. भारताला एका गुणाचे नुकसान सोसावे लागले असून १२१ मानांकन गुणांसह दुसºया स्थानी आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- कोहलीचे सर्वोत्तम ९११ मानांकन गुण
कोहलीचे सर्वोत्तम ९११ मानांकन गुण
भारतीय कर्णधार विराट कोहलीने आयसीसी वन-डे क्रमवारीतील अव्वल स्थान मजबूत करताना कारकिर्दीतील सर्वोत्तम ९११ मानांकन गुण मिळवले आहेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 3:24 AM