नवी दिल्ली : कोरोनामुळे जगात सर्वत्र लॉकडाऊन आहे. क्रिकेट ठप्प आहे. खेळाडू मैदानावर सराव करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. क्रिकेट सुरू करण्यासाठी बीसीसीआयसह आयसीसी देखील प्रयत्न करीत असताना सर्वांना लॉकडाऊन लवकर संपण्याची आशा वाटत आहे. लॉकडाऊननंतर क्रिकेट सुरू होईल तेव्हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे काही विक्रम भारताचा कर्णधार विराट कोहली मोडू शकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सचिनच्या नावावर आंतरराष्टÑीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १०० शतकांची नोंद असून हा विश्वविक्रम मानला जातो. कोहलीची सर्व प्रकारात ७० शतके असल्याने या विक्रमापासून तो बराच लांब आहे. सचिनची एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतके आहेत. हा विक्रम मात्र कोहलीच्या आटोक्यात असेल. शक्यतो याचवर्षी तो सचिनच्या विक्रमाची बरोबरी करू शकतो.
कोहलीची वन डेत सध्या ४३ शतके आहेत. सचिनशी बरोबरी साधण्यासाठी आणखी सहा शतकांची नोंद करावी लागेल. भारतात सर्वाधिक शतकांची नोंद करणाऱ्या सचिनच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी मात्र विराटला केवळ एकच शतक ठोकायचे आहे. सचिनने मायदेशात २० तर कोहलीने १९ शतके ठोकली आहेत.
वन डेत सर्वात कमी डावात ८, ९, १० आणि ११ हजार धावांचा विक्रम कोहलीच्याच नावावर आहे, हे विशेष. त्याने १० आणि ११ हजार धावांच्या टप्प्यात सचिनला बरेच मागे टाकले. भारतीय संघाने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी यावर्षाअखेर आॅस्ट्रेलियाचा दौरा केल्यास कोहली हा आॅस्ट्रेलियात कसोटीत सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडीत काढू शकतो.
सचिन आणि कोहली यांनी आॅस्ट्रेलियात कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येकी ६-६ शतके ठोकली आहेत. सचिनच्या नावावर २० सामन्यात ३८ डावात १८०९ धावा तर कोहलीच्या नावावर १२ सामन्यात २३ डावात १२७४ धावांची नोंद आहे. कोहली हा सचिनच्या तुलनेत केवळ ५३५ धावांनी मागे आहे. (वृत्तसंस्था)
न डेत सर्वात कमी डावात १२ हजार धावा पूर्ण करण्याचा आणखी एक विक्रम आहे. सचिनने ३०० डावांत तर आॅस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगने ३१४ डावात १२ हजार धावांचा पल्ला गाठला. कोहलीने आतापर्यंत २४८ डावात ११ हजार ८३७ धावा केल्या असून १२ हजार धावा पूर्ण करण्यासाठी त्याला १३३ धावांची गरज आहे.
Web Title: Kohli's eye on some of Sachin's records
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.