नवी दिल्ली: आक्रमक शैलीच्या बळावर सतत सरस कामगिरी करीत माजी दिग्गजांच्या प्रशंसेस पात्र ठरलेल्या विराट कोहलीची कर्णधार या नात्याने अग्निपरीक्षा होईल.
आॅस्ट्रेलियाच्या भूमीत कसोटी मालिका जिंकण्याचा मान मिळविणारा पहिलाच कर्णधार ठरलेला कोहली काही समस्याग्रस्त असलेल्या भारतीय संघाचे नेतृत्व करणार असून सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता असलेले काही खेळाडूदेखील संघात आहेत.
चौथ्या स्थानावर फलंदाजी कोण करेल? केदार जाधव यासाठी फिट आहे काय? तिसरा वेगवान गोलंदाज खेळवायचा की अतिरिक्त अष्टपैलू खेळाडू घ्यायचा? कुलदीप की चहल, किंवा दोघेही? या सर्व प्रश्नांना न्याय देताना कर्णधार आणि फलंदाज या दोन्ही आघाड्यांवर कोहलीला यशस्वी होण्याचे आव्हान असेल. भारताने हा विश्वचषक जिंकल्यास संघाच्या तांत्रिक क्षमतेवर शंका घेणाऱ्यांना मोठी चपराक मिळेल, यात शंका नाही.
सात आठवडे चालणाºया या स्पर्धेत कोहलीला ११ हजार धावांचा पल्ला गाठण्याची तसेच ४१ शतकांमध्ये आणखी भर टाकण्याची मोठी संधी असेल. इंग्लंडमधील खेळपट्ट्या पाटा राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे झाल्यास रोहित शर्मा मोठी फटकेबाजी करून शतक ठोकू शकतो. याच माळेत शिखर धवनचा समावेश होतो. आंतरराष्टÑीय सहभागापासून आयसीसी स्पर्धेत कधीही खराब कामगिरी न केल्याची ख्याती तो पुढेही काय ठेवू शकतो.
खरी समस्या पुढे सुरू होते. आघाडीच्या तिन्ही खेळाडूंच्या दमदार कामगिरीनंतरही ही समस्या कायम आहे. चौथ्या स्थानावरील फलंदाज विश्वचषकात धावा काढेल का? अंबाती रायुडू याची संधी हुकली पण या पदासाठी रिषभ पंत याला देखील संघात स्थान मिळू शकले नाही. दिनेश कार्तिकच्या अनुभवास प्राधान्य देण्यात आले. विजय शंकर किंवा लोकेश राहुल या दोघांवर चौथ्या स्थानाला न्याय देण्याची जबाबदारी असेल.महेंद्रसिंग धोनी याला अखेरचा विश्वचषक असंख्य चाहत्यांसाठी भावनत्मक मुद्दा आहे. ३५ धावांवर पोहोचणारा धोनी झटपट अर्धशतक गाठतो, हा चाहत्यांचा विश्वास सार्थ ठरविण्याची जबाबदारी माहीवर असेल. सहाव्या स्थानावर केदार जाधव आणि सातव्या स्थानावर हार्दिक पांड्या यांना स्वत:मधील अष्टपैलू प्रतिभा सिद्ध करावी लागणार आहे.
कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्यावर फिरकीची भिस्त आहे. जसप्रीत बुमराह हा देखील ‘गेमचेंजर’ ठरू शकतो. मोहम्मद शमीचे आऊटस्विंगर आणि बुमराहचे डेथ ओव्हरमधील यॉर्कर प्रतिस्पर्धी संघांमध्ये धडकी भरवू शकतात.भारताला नऊ साखळी सामने खेळायचे आहे. उपांत्य फेरीसाठी पात्रता गाठायची झाल्यास किमान सहा सामन्यात विजय मिळविणे क्रमप्राप्त होणार आहे.(वृत्तसंस्था)