बंगळुरू : 'विराट कोहलीला गुजरात टायटन्सविरुद्ध रविवारी झालेल्या सामन्यादरम्यान गुडघ्याला दुखापत झाली होती. मात्र, चिंतेचे कारण नाही. कारण, कोहलीची ही दुखापत गंभीर नाही,' असे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे (आरसीबी) मुख्य प्रशिक्षक संजय बांगर यांनी सांगितले.
अखेरच्या साखळी सामन्यात आरसीबीचा गुजरातविरुद्ध पराभव झाला. या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना कोहलीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. विजय शंकरचा अप्रतिम झेल घेताना कोहलीचा गुडघा दुखावला होता. यामुळे तो मैदानाबाहेरही गेला. सामन्यातील अखेरचे पाच षटके तो डगआऊटमध्ये बसला होता. आगामी डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याच्या दृष्टीने कोहली तंदुरुस्त असणे भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
सामन्यानंतर बांगर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'होय, कोहलीच्या गुडघ्याला थोडी दुखापत झाली आहे. पण ही दुखापत गंभीर असल्याचे मला वाटत नाही. त्याने चार दिवसांमध्ये दोन शतके झळकावली आहेत. त्याने खूप मोठी धावपळही केली. काही दिवसांपूर्वी झालेल्या सामन्यात तो ४० षटके मैदानावर होता आणि आता गुजरातविरुद्ध तो ३५ षटके मैदानावर राहिला.'