नवी दिल्ली: भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार बनण्याकडे विराट कोहलीची वाटचाल सुरू आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या सध्याच्या मालिकेत विराटने क्लीन स्वीप केल्यास महेंद्रसिंग धोनी याला मागे टाकून कोहली कर्णधार म्हणूनही ‘नंबर वन’ ठरेल.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या कोहलीच्या नेतृत्वात भारताने ४३ कसोटी सामने खेळले. त्यातील २५ जिंकले. नऊ सामन्यात संघ पराभूत झाला तर नऊ सामने अनिर्णीत राहिले. सध्या धोनी सर्वांत यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नावे ६० पैकी २७ विजयांची नोंद असून कोहलीला त्याची बरोबरी साधण्यासाठी केवळ दोनच विजय हवे आहेत. अॅडलेड कसोटी जिंकून भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी संपादन केली. अशावेळी ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा मालिका विजयाची शक्यता बळावली आहे.
कोहली सर्वांत यशस्वी कर्णधारासोबतच विदेशात सर्वाधिक विजय नोंदविणारा कर्णधार देखील बनू शकतो. सध्या हा रेकॉर्ड सौरव गांगुलीच्या नावे आहे. सौरवच्या नेतृत्वात भारताने विदेशात ११ सामने जिंकले. कोहली दहा विजयासह यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
कोहलीच्या नेतृत्वात भारताने श्रीलंकेत सर्वाधिक पाच तर विंडीजमध्ये दोन विजयाची नोंद केली. याशिवाय द. आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात प्रत्येकी एक विजय साजरा केला.
कोहली ऑस्ट्रेलियात सामना जिंकणारा पाचवा कर्णधार ठरला. बिशनसिंग बेदी यांच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियात दोन सामने जिंकले होते. कोहली हा विक्रमही मोडू शकतो. गावसकर, कुंबळे व गांगुली यांनी ऑस्ट्रेलियात एकेक विजय साजरा केला. कोहली ऑस्ट्रेलियात ही कामगिरी करू शकला नाही तर २०१९ मध्ये त्याला पुन्हा संधी असेल. एफटीपीनुसार(भविष्यातील दौरा कार्यक्रम) भारताला पुढील वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ८ कसोटी खेळायचे आहेत. भारताला मार्च महिन्यात झिम्बाब्वेविरुद्ध, जून महिन्यातील विश्वचषकानंतर वेस्ट इंडिजचा दोन कसोटी सामन्यांचा दौरा असेल. याशिवाय द. आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्धही मालिका आहेत.
कोहलीला जगातील सर्वांत यशस्वी कर्णधार बनण्यासाठी मोठा प्रवास करावा लागणार आहे. हा विक्रम सध्या द. आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ याच्या नावे आहे. त्याने 109 पैकी ५३ कसोटी सामने जिंकून दिले.
स्मिथपाठोपाठ ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगने ४८ विजय, स्टीव्ह वॉ ने ४१ विजय, वेस्ट इंडिजचे क्लाईव्ह लॉईड यांनी ३६, अॅलन बॉर्डर ३२, स्टीफन फ्लेमिंग २८, विवियन रिचर्डस् आणि महेंद्रसिंग धोनी यांनी प्रत्येकी २७, मार्क टेलर, मायकेल वॉन आणि पाकचा मिस्बाह उल हक यांनी प्रत्येकी २६ कसोटी सामने जिंकून दिले आहेत.
Web Title: Kohli's 'jump' to become the most successful captain
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.