एजबॅस्टन, बर्मिंगहॅम : कर्णधार विराट कोहली याने भारताचा पराभव टाळण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर इतर फलंदाजांच्या हाराकिरीमुळे पाणी फेरले गेले. मालिकेतील पहिल्याच कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतावर ३१ धावांनी विजय मिळवला. इंग्लंडने एक हजारावा कसोटी सामना विजयानेच साजरा केला.
एजबॅस्टनच्या वेगवान गोलंदाजीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर विराट कोहलीचा अपवाद वगळता दोन्ही डावांत भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली. पाच बाद ११० धावांवरून भारताने पुढे खेळण्यास सुरुवात केली. मात्र ५४.५ षटकांतच भारताचा संघ १६२ धावांवर बाद झाला आणि इंग्लंडने कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पहिल्या डावात १४९ धावांची दमदार खेळी करणाºया कोहलीने दुसºया डावात ५१ धावा केल्या. भारताकडून दोन्ही डावात सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज ठरला. त्यापाठोपाठ दुसºया क्रमांकाची सर्वाधिक धावसंख्या हार्दिक पंड्या (३१ धावा) याने केली.
बेन स्टोक्स याने चौथ्या दिवसाचा खेळ आपल्या नावावर केला. त्याने ४० धावांत चार बळी घेतले. त्याने कोहली आणि शमी यांना एकाच षटकात बाद करत इंग्लंडच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. दोन्ही डावातील फलंदाजांचे अपयश हे भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले.
चौथ्या दिवसाची सुरुवात भारतासाठी खराब राहिली. दिनेश कार्तिक पहिल्याच षटकात तंबूत परतला. अँडरसनने त्याला बाद केले. त्यानंतर पंड्या आणि कोहली यांनी सातव्या गड्यासाठी २९ धावांची भागीदारी केली. कोहलीने कसोटीतील आपले १७ वे अर्धशतक पूर्ण केले. मात्र स्टोक्सने कोहलीला बाद करत इंग्लंडला आघाडीवर नेले. त्यानंतर ईशांत शर्मा (११ धावा) याने आपल्या खेळातील सहजता दाखवली आणि इंग्लंडचा कर्णधार रुट याने चतुर खेळी खेळली. आदिल राशिदकडे चेंडू सोपवला. त्याने ईशांतला गुगलीवर बाद केले. ९ गडी बाद झाले तरी पंड्या एका बाजूने खेळी करत होता. स्टोक्सच्या चेंडूवर त्याचा उडालेला झेल स्लिपमध्ये कुकने घेतला आणि इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. (वृत्तसंस्था)
>विजयाचे श्रेय गोलंदाजांना : रुट
पहिल्या कसोटीत भारतावर चौथ्या दिवशीच विजय मिळविण्याचे श्रेय गोलंदाजांना जात असल्याची प्रतिक्रिया इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट याने व्यक्त केली. तो म्हणाला, ‘मी थोडा रोमहर्षक झालो. जय- पराजयाचे पारडे दोन्ही संघांकडे झुकले असताना आमच्याकडून शानदार कामगिरी घडली. याचे संपूर्ण श्रेय गोलंदाजांना जाते. फलंदाजांवर टीका करणे सोपे असते, शांतचित्ताने खेळल्यास विजय मिळतो, हे आम्ही दाखवून दिले. याचे श्रेय गोलंदाजांना आहे.’ रुटने दुसºया डावात ६५ चेंडूंत ६३ धावा ठोकणाºया सॅम कुरेनचे कौतुक केले.
>हरलो, पण लढल्याचा अभिमान : विराट
पहिल्या कसोटीत भारताला इंग्लंडकडून ३१ धावांनी निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्याचा हिरो अष्टपैलू खेळाडू सॅम कुरेन ठरला. तथापि, सामन्यात रंगत भरली ती विराट कोहलीच्या फलंदाजीनेच.
सामन्यानंतर बोलताना विराट म्हणाला, ‘सामना एकतर्फी न होता रंगतदार झाला, याचा आनंद आहे. आम्ही शंभर टक्के योगदान दिले. इंग्लंडची कामगिरी आमच्यापेक्षा सरस ठरल्यामुळे पराभव झाला. आम्ही हरलो तरी लढल्याचा अभिमान वाटतो.’
फलंदाज आणखी चांगली कामगिरी करू शकले असते पण ते धावा काढण्यात अपयशी ठरल्याची कबुली देत विराट म्हणाला, ‘आमचा पराभव झाला तरी लढा दिल्याचा आनंद आहे. पुढील कसोटी सामन्यात चांगली कामगिरी करू, असा निर्धार आहे.’
या सामन्यात विराटने १४९ आणि ५१ धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त एकाही भारतीय फलंदाजाला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. दुसरीकडे ईशांत शर्मा आणि आश्विनने गोलंदाजीत मोलाचे योगदान दिले.
>ईशांतला दंड
भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मावर इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मलानला बाद केल्यानंतर चुकीच्या पद्धतीने जल्लोष केल्याप्रकरणी शनिवारी सामना शुल्काच्या १५ टक्के रकमेचा दंड ठोठावण्यात आला.
ईशांतने पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसºया दिवशी शुक्रवारी मलानला बाद केल्यानंतर चुकीच्या पद्धतीने जल्लोष केला होता. त्यानंतर त्याच्यावर दंडाव्यतिरिक्त एका डिमेरिट गुणाची नोंदही झाली.
आयसीसीने स्पष्ट केले, ‘आयसीसीने खेळाडूंच्या आचारसंहिता लेव्हल वनच्या उल्लंघनप्रकरणी ईशांत शर्मावर सामना शुल्काच्या १५ टक्के रकमेचा दंड ठोठावला आहे. याव्यतिरिक्त त्याच्या खात्यात एका डिमेरिट गुणाची नोंदही झाली आहे.’
ईशांतने संहितेच्या कलम २.१.७ चे उल्लंघन केले. त्यात ‘प्रतिस्पर्धी खेळाडूला बाद केल्यानंतर अपशब्द किंवा चुकीचा इशारा केल्यामुळे शिक्षेचे प्रावधान आहे.’
आयसीसीने म्हटले आहे, की ही घटना शुक्रवारी खेळाच्या पहिल्या सत्रादरम्यान घडली.
>कोहलीकडून शिकण्याचा प्रयत्न केला : कुरेन
विराट कोहलीने तळाच्या फलंदाजांच्या साथीने केलेल्या खेळीतून शिकण्याचा प्रयत्न केला, अशी प्रतिक्रिया भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या विजयात ‘हीरो’ ठरलेला युवा अष्टपैलू सॅम कुरेनने व्यक्त केली.
कुरेन म्हणाला, ‘होत असलेली प्रशंसा व कौतुकाचा वर्षाव बघून स्वप्न बघत असल्याचा भास होत आहे. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास तळाच्या फलंदाजांच्या साथीने कसे खेळावे लागते, हे मी विराट कोहलीच्या खेळीतून शिकण्याचा प्रयत्न केला.’कुरेनने पहिल्या डावात चार बळी घेतल्यानंतर दुसºया डावात ६३ धावांची महत्त्वाची खेळी केली. त्यामुळे इंग्लंडला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात यश आले. कुरेन म्हणाला, ‘शुक्रवारी रात्री हॉटेलमध्ये कुमार संगकारासोबत भेटलो होतो. त्याने मला तळाच्या फलंदाजांसोबत कसे खेळायचे, याच्या टिप्स दिल्या होत्या. मी रोज शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण ज्यांचा खेळ बघून लहानाचा मोठा झालो त्यांच्यापुढे मी कसोटी क्रिकेट खेळत आहे.’ भारताच्या दुसºया डावात चार बळी घेणाºया बेन स्टोक्सनेही कुरेनची प्रशंसा करताना म्हटले, की त्याची अर्धशतकी खेळी सामन्याचा टर्निंग पॉर्इंट ठरली. स्टोक्स म्हणाला, ‘मला वाटले की, आम्ही मोठी आघाडी घेऊ शकत नाही, पण कुरेनने प्रतिस्पर्धी
संघाला सामन्यातून बाहेर केले. त्याने या वयात केलेली फलंदाजी त्याच्या कारकिर्दीला नवे वळण देणारी ठरेल.’
कोहलीबाबत बोलताना स्टोक्स म्हणाला, ‘कोहलीने पहिल्या डावात शानदार फलंदाजी केली, पण ज्यावेळी चेंडू स्विंग होत होता त्यावेळी आत येणाºया चेंडूवर तो लाईनमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न करीत होता. त्यात तो अपयशी ठरला आणि चेंडू पॅडवर आदळल्यामुळे पायचित झाला.’
>धावफलक
इंग्लंड : पहिला डाव : २८७.
भारत : पहिला डाव : २७४.
इंग्लंड : दुसरा डाव : १८०.
भारत : दुसरा डाव : ५४.२ षटकांत सर्व बाद १६२.
मुरली विजय पायचित ब्रॉड ६, शिखर धवन झे. बेअरस्टो गो. ब्रॉड १३, लोकेश राहुल झे. बेअरस्टो गो. स्टोक्स १३, विराट कोहली पायचित स्टोक्स ५१, अजिंक्य रहाणे झे. बेअरस्टो गो. कुरेन २, आर. आश्विन झे. बेअरस्टो गो. अँडरसन १३, दिनेश कार्तिक झे. मलान गो. अँडरसन २०, हार्दिक पंड्या झे. कुक गो. स्टोक्स ३१, मोहम्मद शमी झे. बेअरस्टो गो. स्टोक्स ०, ईशांत शर्मा पायचित राशिद ११, उमेश यादव नाबाद ०, अवांतर २. गोलंदाजी : जेम्स अँडरसन १६-२-५०-२, स्टुअर्ट ब्रॉड १४-२-४३,२, बेन स्टोक्स १४.२-२-४०-४, सॅम कुरेन ६-०-१८-१, आदिल राशिद ४-१-९-१.
Web Title: Kohli's truce, India's downfall
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.