नागपूर - श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दमदार द्विशतक ठोकलं आहे. विराटचे हे कसोटी कारकिर्दीतील पाचवे द्विशतक आहे. 15 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 259 चेंडूत कोहलीनं 200 धावा केल्या. याबरेबरच विराटनं कर्णधार म्हणून ब्रायन लाराच्या पाच द्विशतकाची बरोबरी केली. तर डॉ ब्रॅडमन, मायकल क्लार्क आणि आफ्रिकेचा माजी कर्णधार स्मिथ यांचा कर्णधार म्हणून केलेल्या चार द्विशतकाचा विक्रम मोडला. विराट कोहलीनं तिसऱ्या दिवशी दमदार फलंदाजी करताना 213 धावांची विराट खेळी केली.
विराटचं शतक; गावसकरांचा विक्रम मोडला -नागपूर कसोटीत मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारापाठोपाठ कर्णधार विराट कोहलीनंही शतक ठोकलं आहे. या मालिकेतलं विराटचं हे दुसरं शतक आहे, तर कसोटी कारकिर्दीतलं विराटचं हे 19वं शतक आहे. हे शतक झळकावत विराटनं सुनील गावस्कर यांचा कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकांचा विक्रमही मोडीत काढला आहे. कर्णधारपदाची धुरा सांभाळत ठोकलंल विराटचं हे 12वं शतक आहे. त्यामुळे विराट सर्वाधिक शतकं ठोकणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. गावसकर यांनी कर्णधार असताना कसोटीत 11 शतकं ठोकली होती.
कर्णधार म्हणून वर्षभरात सर्वाधिक शतकांचा विक्रम - विराटने शतक झळकावत आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. विराटने यावर्षी सर्व प्रकारांमध्ये एकूण 10 शकतं झळकावली आहेत. यासोबत एका वर्षात सर्वाधिक शतकं ठोकण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. हा रेकॉर्ड याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या नावे होता. पॉन्टिंग ने 2005 आणि 2006 मध्ये 9-9 शतकं झळकावली होती. विराटने यावर्षी एकदिवसीय सामन्यात 6 तर कसोटी सामन्यात 4 शकतं झळकावली आहेत.
सचिनचाही तोडला विक्रम - वेगाने 19 कसोटी शतकांपर्यंत पोहोचणारा विराट पहिलाच भारतीय फलंदाज आहे. त्याने 104 इनिंगमध्ये 19 शतकं पूर्ण केले.विराटनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकलं. सचिनने 105 कसोटींमध्ये 19 शतकं पूर्ण केले होते. सर्वाधिक वेगाने 19 शतकांपर्यंत पोहोचण्याचा विक्रम सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे.