५ ऑक्टोबरपासून भारतात होणार्या आयसीसी वन डे वर्ल्ड कप २०२३ आणि त्याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी (IND vs AUS ) मोहम्मद शमीला मोठा दिलासा मिळाला आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज शमी श्रीलंकेत आशिया कप २०२३ चे विजेतेपद पटकावल्यानंतर थेट कोलकाता पोहोचला. जिथे त्याला मंगळवारी अलीपूर कोर्टातून जामीन मिळाला. शमीवर त्याची माजी पत्नी हसीन जहाँने घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते.
हसीन जहाँने २०१८ मध्ये शमीविरोधात घरगुती हिंसाचार आणि क्रूरतेचा गुन्हा दाखल केला होता. लग्नानंतर शमीने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप हसीनने केला होता आणि अलीपूर पोलिस ठाण्यात घरगुती हिंसाचाराच्या गुन्ह्याखाली एफआयआर दाखल केला होता. याबाबत महिला तक्रार कक्षाने शमी आणि त्याच्या भावाची चौकशीही केली होती. ज्यावर कोलकात्याच्या स्थानिक न्यायालयाने वॉरंट जारी केल्यानंतर त्यावर बंदी घातली होती. आता याप्रकरणी शमीला जामीन मिळाला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ वन डे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २२ सप्टेंबर रोजी मोहाली येथे होणार आहे. यासाठी सर्व खेळाडू २० सप्टेंबरपर्यंत चंदीगडला पोहोचतील. आता शमी लवकरच कोलकाताहून चंदीगडला रवाना होणार आहे. शमीने भारताकडून आतापर्यंत ९२ वन डे सामन्यात १६५ विकेट घेतल्या आहेत.