Kolkata Knight Riders and Chennai Super Kings, IPL 2024 : सध्या सुरू असलेल्या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत युवा खेळाडूंनी मैदान गाजवलेले दिसतेय.. यशस्वी जैस्वाल तर तुफान फॉर्मात आहे आणि राजकोटमध्ये पदार्पणाची संधी मिळालेल्या सर्फराज खान ( Sarfaraz Khan) यानेही चुणून दाखवली. त्याने दोन्ही डावांत अर्धशतकी खेळी करून विक्रमी कामगिरी नोंदवली आणि आता त्याच्यासाठी आयपीएल फ्रँचायझींमध्ये चढाओढ रंगलेली पाहायला मिळतेय. इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ला २२ मार्चपासून सुरूवात होण्याची शक्यता बळावली आहे, कारण चेअरमन धुमाळ यांनी तशी घोषणा केली.
सर्फराजची कसोटीतील खेळी पाहून कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन संघ त्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. आयपीएल २०२४ साठी डिसेंबरमध्ये पार पडलेल्या लिलावात मुंबईचा खेळाडू अनसोल्ड राहिला होता. १० पैकी एकाही फ्रँचायझीने २० लाख मुळ किंमत असलेल्या या खेळाडूसाठी बोली लावली नव्हती. पण, आता त्याला आयपीएलचा करार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्फराजने सातत्याने खोऱ्याने धावा चोपल्या आहेत आणि त्याचे फळ त्याला कसोटी पदार्पणाच्या संधीतून मिळाले.
राजकोट कसोटीत पदार्पण करताना त्याने ६८ धावांची स्फोटक खेळी केली, परंतु दुर्दैवाने तो रन आऊट झाला. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने नाबाद ६२ धावा करताना यशस्वी जैस्वालसह १७२ धावांची नाबाद भागीदारी केली आणि संघाच्या ४३४ धावांच्या विजयात हातभार लावला. राजकोटमधील कामगिरीनंतर सर्फराजला आपल्या संघात घेण्यासाठी आयपीएल फ्रँचायझी सरसावल्या आहेत. आनंदबाजार पत्रिकाने दिलेल्या वृत्तानुसार सर्फराजसाठी तीन फ्रँचायझी इच्छुक आहेत.
कोलकाता नाइट रायडर्सचा मेंटॉर गौतम गंभीरने त्याच्या फ्रँचायझीमधील अधिकाऱ्यांना २७ वर्षीय खेळाडूसाठी प्रयत्न करा, असा सल्ला दिला आहे. KKR कडे रिंकू सिंग, नितिश राणा, श्रेयस अय्यर, जेसन रॉय, आंद्रे रसेल आदी स्फोटक फलंदाज आहेत आणि त्यात सर्फराज आल्याने संघाला फायदा होईल. चेन्नई सुपर किंग्सही सर्फराजसाठी प्रयत्नशील आहे आणि धोनीने फ्रँचायझीला तसा सल्ला दिला आहे. याशिवाय २०१५ ते २०१८ या कालावधीत ज्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून तो खेळला, तिही फ्रँचायझी प्रयत्न करतेय. सर्फरातने २०१५ ते २०२३ मध्ये २३ सामन्यांत ५८५ धावा केल्या. २०१९ ते २०२१ मध्ये तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला, परंतु त्याला फार काही कमाल करता आली नाही.
KKR चे पारडे जड, कारण...आयपीएल लिलावात कोलकाता नाइट रायडर्स वगळता अन्य ९ संघांनी त्यांच्या २५ खेळाडूंचा कोटा पूर्ण केला आहे. KKR ने केवळ २३ खेळाडू करारबद्ध केले आहेत आणि त्यामुळे ते सर्फराजला आपल्या ताफ्यात घेऊ शकतात. अन्य संघाना या खेळाडूला आपल्याकडे घेण्यासाठी संघातील एक खेळाडू रिलीज करावा लागेल.