- सुनील गावसकर
कोलकाता नाईट रायडर्सला साखळी फेरीतील अखेरचा सामना खेळण्याचा मोठा फायदा मिळेल. यापूर्वीच्या सामन्यांचा निकाल माहीत असल्यामुळे त्यांना पात्रता मिळविण्यासाठी केवळ विजय आवश्यक आहे की विजयासह नेट रनरेटमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, याची कल्पना राहील. शेवटी ते सर्वकाही राजस्थान रॉयल्स व सनरायजर्स हैदराबाद संघांच्या लढतीच्या निकालावर अवलंबून राहणार आहे. राजस्थान रॉयल्सने विजय मिळविला, तर कोलकाता नाईट रायडर्स संघाला प्ले-आॅफ गाठण्यासाठी मुंबई इंडियन्सविरुद्ध केवळ विजयाची गरज राहील. पण, सनरायजर्सने बेंगळुरू चा पराभव केला, तर केकेआर संघाला मुंबईचा पराभव करताना सनरायजर्सपेक्षा सरस नेट रनरेट राखावा लागेल.
कोलकाता संघाने किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध मिळविलेल्या विजयात युवा शुभमन गिलची कामगिरी उल्लेखनीय ठरली. गिलने आपली प्रतिभा सिद्ध केली. केकेआर संघ पराभवाचे दुष्टचक्र भेदण्यात यशस्वी ठरल्यामुळे त्यांचे मनोधैर्य उंचावण्यास मदत झाली. महत्त्वाचे म्हणजे गेल्या आठवड्यात त्यांनी मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. आंद्रे रसेलच्या कामगिरीच्या जोरावर त्यांनी २०० चा पल्ला ओलांडला होता. मुंबईतर्फे हार्दिक पांड्याचे प्रयत्न अखेर अपुरेच पडले.
चेन्नई संघ गुणतालिकेत नक्कीच अव्वल स्थानी राहणार असल्याचे निश्चित आहे. स्पर्धेत शानदार सुरुवात करणाºया चेन्नई संघाने मधल्या काळात लय गमावली होती. धोनी फिट असेल तर चेन्नई सुपरकिंग्सला विशेषत: त्यांच्या गृहमैदानावर रोखणे कठीण असते.
खेळपट्टी फिरकीला अनुकूल असून, त्यांच्या संघात खेळापट्टीचा लाभ घेण्यासाठी इम्रान ताहिर, हरभजन सिंग आणि रवींद्र जडेजा या फिरकीपटूंचा समावेश आहे. दरम्यान, मोहालीमध्ये लढत झाली तर त्यांच्यापैकी एका फिरकीपटूला विश्रांती द्यावी लागेल.
Web Title: Kolkata Knight Riders news
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.