saina nehwal cricket : भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल अन् तिने क्रिकेटबद्दल केलेले एक विधान मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. याच विधानाचा दाखला देत कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू अंगकृष रघुवंशीने टिप्पणी केली. पण, या टिप्पणीने रघुवंशी वादाच्या भोवऱ्यात सापडला आणि अखेर त्याला माफी देखील मागावी लागली. चाहत्यांच्या रोषानंतर त्याने माफी मागत आपल्याला कोणाचे मन दुखवायचे नसल्याचे स्पष्ट केले. आयपीएल २०२४ मध्ये केकेआरच्या संघाकडून पदार्पण करणाऱ्या रघुवंशीने सायना नेहवालच्या व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली.
व्हायरल व्हिडीओमध्ये सायना म्हणते की, टेनिस, बॅडमिंटन आणि बास्केटबॉल यांसारखे खेळ क्रिकेटच्या तुलनेत अधिक धाडसी आहेत. या खेळांमध्ये क्रिकेटपेक्षा अधिक कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे प्रत्येकाला आमचा खेळ पाहावासा वाटतो. प्रत्येकाला जाणून घ्यायचे असते की, पैलवान आणि बॉक्सर्स काय करत आहेत. नीरज चोप्रा काय करत आहे. आम्ही सातत्याने चांगली कामगिरी करतो म्हणून आमची ओळख झाली आहे. त्यामुळेच आम्हाला माध्यमांमध्ये जागा मिळते. मी हे भारतात केले आहे, जिथे क्रीडा संस्कृती नाही असे मला स्वप्नही पडते.
सायना नेहवालने आणखी सांगितले की, कधी-कधी मला वाटते की, क्रिकेटवरच अधिक लक्ष केंद्रित केले जाते. आपल्या देशात या खेळालाच प्राधान्य दिले जाते. जर तुम्ही बॅडमिंटन, बास्केटबॉल, टेनिस आणि इतर खेळ बघितले तर ते शारीरिकदृष्ट्या खूप कठीण आहेत. या खेळात तुम्ही खूप कठीण श्वास घेत असता. क्रिकेट सारख्या खेळावर खूप लक्ष केंद्रित केले आहे जिथे मला वैयक्तिकरित्या कौशल्य अधिक महत्वाचे वाटते.
सायनाच्या विधानाचा दाखला देत केकेआरचा स्टार रघुवंशीने म्हटले की, चला तर मग पाहूया... ती (सायना) जसप्रीत बुमराहच्या १५० च्या गतीचा कसा सामना करते ते. तो थेट डोक्यावर चेंडू मारतो. रघुवंशीची ही पोस्ट वाऱ्यासारखी व्हायरल झाली मग अखेर त्याला माफी मागावी लागली. माफी मागताना त्याने सांगितले की, मला सर्वांनी माफ करा, मी विनोद म्हणून माझी टिप्पणी केली, मागे वळून पाहिले तर मला जाणवले की हा एक अपरिपक्व विनोद होता. मला माझी चूक कळली आहे आणि मी मनापासून माफी मागतो.