Join us  

“झूमे जो रिंकू!!!” रिंकू सिंगच्या खेळीची शाहरुख खानलाही भुरळ; खास ट्विट करत केलं कौतुक

कोलकाता नाइट रायडर्स संघाचा सहमालक आणि बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान याने देखील ट्विट करत रिंकूवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 8:24 AM

Open in App

अखेरच्या घटकात विजयासाठी २९ धावांची गरज असताना रिंकू सिंगने ( Rinku Singh) वेगवान गोलंदाज यश दयालला सलग पाच षटकार खेचले. रिंकूच्या या तडाख्याच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने हातातून गेलेला सामना जिंकताना गुजरात टायटन्सला तीन गड्यांनी नमवले. यासह कोलकाताने गुजरातला विजयी हॅटट्रिकपासून दूर ठेवले. विशेष म्हणजे, गुजरातचा हंगामी कर्णधार राशीद खानने घेतलेली हॅटट्रिकही रिंकूपुढे वाया गेली.

इम्पॅक्ट प्लेअर वेंकटेश अय्यरने चांगली फलंदाजी करताना कोलकाता नाइट रायडर्सला विजयाच्या उंबरठ्यावर आणली होती. पण, गुजरातचा कर्णधार राशीद खानने हॅटट्रिक घेताना मॅच फिरवली. ६ चेंडूंत २९ धावा हव्या असताना कोलकाता हा सामना जिंकेल, असे कोणालाही वाटले नव्हते. रिंकू सिंगला उमेश यादवने एक धाव घेत स्ट्राईक दिली. त्यानंतर रिंकून १,२,३ नव्हे तर सलग पाच षटकार खेचले अन्  कोलकाताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी रिंकूला मिठी मारली अन् त्यांच्या डोळ्यांत पाणी दाटून आले होते.

रिंकूच्या या वादळी खेळीचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघाचा सहमालक आणि बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान याने देखील ट्विट करत रिंकूवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच पठाण चित्रपटाच्या पोस्टरमध्ये शाहरुख खानने त्याच्याजागी रिंकूचा फोटो पोस्ट करत “झूमे जो रिंकू!!!” , असं म्हटलं आहे.

भारतीय संघाचा आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने देखील कौतुक केलं आहे. आयपीएल एक अशी लीग आहे की ज्यामध्ये प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते. रिंकूची अविश्वसनीय खेळी होती. यश दयालसाठी कठीण दिवस होता. यातून नक्की शिक, असं रोहित शर्माने म्हटलं आहे.

प्रथम फलंदाजी करताना गुजरातने आयपीएलमध्ये प्रथमच द्विशतकी मजल मारताना २० षटकांत चार बाद २०४ धावा केल्या. हे आव्हान अखेरच्या चेंडूवर पार केलेल्या कोलकाताने २० षटकांत सात बाद २०७ धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना कोलकाताची अडखळती सुरुवात झाल्यानंतर इम्पैक्ट खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या व्यंकटेश अय्यरने प्रभावी फटकेबाजी केली. त्याला कर्णधार नितीश राणाने चांगली साथ दिली.

थरारक षटक

व्यंकटेश राणा यांनी तिसया गड्यासाठी ५५ चेंडूत १०० धावांची भागीदारी केली. अय्यर बाद झाल्यानंतर १७च्या षटकात राशीदने गुजरातला पकड मिळवून देत आहे रसेल, सुनील नरेन व शार्दुल ठाकूर यांना सलग तीन चेंडूवर बाद केले. मात्र, अखेरच्या षटकात रिंकूने सामना फिरवताना गुजरातच्या हातातून सामना खेचून आणला.

टॅग्स :आयपीएल २०२३कोलकाता नाईट रायडर्सशाहरुख खानरोहित शर्मा
Open in App