स्ट्रेट ड्राईव्ह,सुनील गावस्करप्ले ऑफच्या रेसमध्ये कायम राहण्यासाठी तीन संघांची विजयी घोडदौड सुरू आहे. हे तिन्ही संघ मंगळवारी मैदानात असतील. केकेआरची लढत दिल्लीविरुद्ध, तर पंजाबचा सामना मुंबईविरुद्ध असेल. हे संघ एकमेकांना धक्का देण्याच्या इराद्याने खेळतील. दिल्ली सध्या जबर फॉर्ममध्ये आहे. चतुरस्र नेतृत्वात सहज विजय नोंदविणाऱ्या दिल्लीचा इतरांनी धसका घेतला आहे. केकेआरने काही चांगले विजय नोंदविले; पण सीएसकेकडून अखेरच्या चेंडूवर झालेला पराभव त्यांना विसरावा लागेल. केकेआर अखेरपर्यंत जिंकण्याच्या स्थितीत होता, पण सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या रवींद्र जडेजाने १९ व्या षटकात प्रसिद्धीच्या गोलंदाजीत २१ धावा फटकवून सामना खेचून नेला. १९ व्या षटकात खरे तर उत्कृष्ट गोलंदाज लावायचा असतो. याद्वारे प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणून अखेरच्या षटकात लक्ष्य आणखी मोठे करता येते.
प्रसिद्धच्या चेंडूत वेग असेल; पण दोन षटकार लागताच तो दिशाहीन झाला. नंतर दोन फुलटॉस टाकल्याचे आश्चर्य वाटले नाही. सामन्याचा निकाल अखेरच्या चेंडूपर्यंत यासाठी लांबतो कारण आधुनिक खेळात आक्रमकता दाखविण्याचा अधिक प्रयत्न होतो. जमिनीवर फटके मारण्याऐवजी हवेत उत्तुंग फटका खेळण्याच्या नादात ते बाद होतात.
आरसीबीविरुद्ध मुंबईला याच आक्रमकतेचा फटका बसला. त्यांचे फलंदाज गरज नसताना फटका खेळत गेल्याने गोलंदाजांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले. प्ले ऑफसाठी मुंबईला आता सर्व सामने जिंकावेच लागतील. हैदराबादविरुद्ध शारजात कमी धावसंख्येचा बचाव करणाऱ्या पंजाबला आणखी एक संधी मिळाली. मुंबईविरुद्ध मंगळवारी विजयी घोडदौड कायम राखण्याची या संघाकडे संधी असेल. (टीसीएम)