रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताने २०२३च्या वर्ल्ड कप स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली आहे आणि उपांत्य फेरीत अव्वल स्थानासह प्रवेश केला आहे. भारतीय संघाची नेत्रदीपक कामगिरी झालेली आहे आणि त्यांनी सलग ८ सामने जिंकलेले आहेत. त्यामुळे भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे आणि उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर चौथ्या क्रमांकावरील संघ असेल. न्यूझीलंड, अफगाणिस्तान व पाकिस्तान हे संघ या शर्यतीत आहेत. त्यात पाकिस्तानमुळे रोहित अँड कंपनीचं टेंशन वाढलं आहे.
तालिकेत अव्वल स्थान असूनही भारतीय संघ उपांत्य फेरीचा सामना कुठे खेळेल याचा निर्णय होत नाहीए. आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पहिली उपांत्य फेरी मुंबईत १५ नोव्हेंबरला आणि दुसरी उपांत्य फेरी १६ नोव्हेंबरला कोलकाता येथे होणार आहे. त्यानुसार भारताची लढत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणे अपेक्षित आहे, परंतु त्यात बदल करावा लागू शकतो. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेपूर्वी एक विनंती केली होती आणि तिच आता भारतीय संघाच्या मुंबईत खेळण्याच्या मार्गातील अडथळा बनतेय.
पाकिस्तान चौथ्या क्रमांकासह जर उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले तर IND vs PAK सामना होईल. पण, तसे झाल्यास तो सामना मुंबईहून कोलकाताच्या ईडन गार्डनवर हलवली जाईल. पाकिस्तान संघाची मॅच मुंबईत नको अशी विनंती PCB ने केली होती आणि त्यामुळेच साखळी फेरीतील त्यांचा सामना इथे झालाच नाही. उपांत्य फेरीचाही सामना मुंबईऐवजी कोलकाता येथे होईल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मुंबईत त्यांच्या संघाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली होती.
पाकिस्तानसाठी बॅड न्यूजन्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातला सामना आशियाई संघाने जिंकावा यासाठी पाकिस्तान दुवा करत आहेत. कारण न्यूझीलंड हरल्यास त्यांचा नेट रन रेट पडेल आणि पाकिस्तानला अखेरचा सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश करता येईल. पण, न्यूझीलंडने उद्या विजय मिळवल्यास ते १० गुण व सरस नेट रन रेटसह आपले स्थान जवळपास पक्कं करतील. पाकिस्तानला मुसंडी मारण्यासाठी शेवटच्या साखळी सामन्यात १३० किंवा त्यापेक्षा अधिक धावांनी विजय मिळवावा लागेल. तर त्यांचा नेट रन रेट हा किवींपेक्षा सरस होईल आणि ते उपांत्य फेरीत जातील.