नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीवर त्याची पत्नी हसीन जहाँने गंभीर आरोप केले होते. त्याचबरोबर हसीनने कोलकाता पोलीसांकडे तक्रारही केली होती. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी कोलकाता पोलीसांनी बीसीसीआयकडे शामीची काही माहिती मागवली आहे.
शामी आणि त्याची पाकिस्तानी मैत्रिण आलिशबा हे दक्षिण आफ्रिकेत एकत्र होते. तिथून ते दोघे दुबईला गेला. दुबईमध्ये या दोघांनी काही काळ एकत्र एकाच रुममध्ये व्यतित केल्याचा आरोप हसीनने केला होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात नेमके काय झाले होते, याची माहिती कोलकाता पोलीसांनी बीसीसीआयकडून मागवली आहे.
मोहम्मद शामी हा संघाबरोबरच प्रवास करत होता का ? जर तो संघाबरोबर नव्हता तर प्रवास खर्च बीसीसीआयने केला होता की शामीने ? त्याचबरोबर शामी संघाबरोबर दुबईला गेला होता का ?, असे काही प्रश्न कोलकाता पोलीसांनी बीसीसीआयला विचारले आहेत.
एका पाकिस्तानी मुलीसोबत शामीचे अफेअर असून विविध मुलींसोबत ओळख वाढणे आणि त्यांच्याशी संबंध स्थापन करणे अशा कृत्यात शामी गुंतला असल्याचा खळबळजनक आरोप केल्यानंतर हसीनने शामीवर आणखी एक आरोप केला होता. एका चॅनलला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये हसीनने शमीवर तिच्या हत्येचा कट आणि मॅच फिक्सिंगचा सनसनाटी आरोप केला होता. माझा खून करून मृतदेह जंगलामध्ये दफन करून टाक असं शामी त्याच्या भावाला म्हणाला होता असा गंभीर आरोप हसीनने केला होता.
बीसीसीआयकडून माहिती मिळाल्यावर शामीला कोलकाता पोलीस चौकशीसाठी बोलणार असल्याची माहिती मिळत आहे.