IPL 2024 Updates: सध्या जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग अर्थात आयपीएलचा सतरावा हंमाम सुरू आहे. गुरुवारपर्यंत झालेल्या ९ सामन्यांमध्ये यजमान संघाचा दबदबा पाहायला मिळाला. सुरुवातीच्या सर्व सामन्यांमध्ये यजमान संघाने विजय मिळवला. मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना ऐतिहासिक ठरला. या सामन्यात यजमान हैदराबादच्या संघाने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. त्यांनी निर्धारित २० षटकांत ३ बाद २७७ धावा करून इतिहास रचला. (IPL 2024 News)
मुंबईचा संघ प्रथमच हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळत आहे. त्यामुळे माजी कर्णधार रोहित शर्माचे चाहते नाराज आहे. चाहत्यांकडून रोहित शर्मा विरूद्ध हार्दिक पांड्या असे वातावरण तयार केले जात आहे. अशातच कोलकाता पोलिसांनी केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय बनली. मुंबईने आपला सलामीचा सामना अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरूद्ध खेळला. इथे हार्दिक पांड्याला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये 'रोहित रोहित' अशा घोषणांचा पाऊस पडला.
कोलकाता पोलिसांनी हार्दिकची फिरकी घेणारी एक पोस्ट केली आहे. खरं तर पोलिसांनी क्युआर कोडच्या स्कॅमपासून सावध राहण्यासाठी रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांचे उदाहरण दिले. पोलिसांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये क्युआर कोड दिसत आहे. कोलकाता पोलिसांनी कॅप्शनच्या माध्यमातून म्हटले की, जेव्हा कोणी पैशांसाठी क्युआर कोडचा वापर करते अशावेळी घोटाळेबाज ओळखा. क्युआर कोडच्या खाली रोहितचा फोटो आहे, ज्यावर लिहिले की, 'बँक खाते' आणि हार्दिकच्या फोटोवर 'धोखा' असा उल्लेख आहे.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने आतापर्यंत केवळ दोन सामने खेळले आहेत. दोन्ही सामन्यांमध्ये मुंबईला पराभव पत्करावा लागला. कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या अपयशी ठरल्याचे दिसले. जसप्रीत बुमराहला पहिले षटक का दिले जात नाही असा प्रश्न जाणकारांनी उपस्थित केला.