Join us  

विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

इकाना स्टेडियमवर पहिल्यांदाच कोणत्याही टी-२० सामन्यात द्विशतकी धावसंख्या उभारली गेली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 5:26 AM

Open in App

लखनौ : एकतर्फी झालेल्या सामन्यात कोलकाताने दणदणीत विजय मिळवताना लखनौचा ९८ धावांनी पराभव केला. यासह कोलकाताने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावत प्ले ऑफमधील स्थानही जवळपास निश्चित केले. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने २० षटकांत ६ बाद २३५ धावांचा डोंगर उभारला. यानंतर लखनौचा डाव १६.१ षटकांत १३७ धावांमध्ये संपुष्टात आणत कोलकाताने सहज बाजी मारली. सुनील नरेनचा धडाकेबाज अष्टपैलू खेळ कोलकातासाठी मोलाचा ठरला.

इकाना स्टेडियमवर पहिल्यांदाच कोणत्याही टी-२० सामन्यात द्विशतकी धावसंख्या उभारली गेली. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौकडून एकाही फलंदाजाला छाप पाडता आली नाही. दुसऱ्याच षटकात मिचेल स्टार्कने अर्शिन कुलकर्णीला बाद केल्यानंतर कोलकाताने ठरावीक अंतराने बळी घेत लखनौचा पराभव स्पष्ट केला. हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्थी यांनी प्रत्येकी ३ बळी घेत लखनौच्या फलंदाजीला खिंडार पाडले. 

त्याआधी, फिल सॉल्ट आणि सुनील नरेन यांच्या वादळी सलामीच्या जोरावर कोलकाताने भक्कम धावसंख्या उभारली. नरेनने २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. वेगवान गोलंदाज नवीन उल हकने ३ बळी घेतले. यासह कोलकाताने लखनौच्या इकाना स्टेडियममध्ये सर्वाधिक धावसंख्येचा विक्रमही नोंदवला. सॉल्ट - नरेन यांनी २६ चेंडूंत ६१ धावांची जबरदस्त सलामी दिली. नवीन उल हकने पाचव्या षटकात सॉल्टला बाद करून ही जोडी फोडली. 

यानंतर आक्रमणाची सर्व सूत्रे आपल्याकडे घेत नरेनने अंगक्रिश रघुवंशीसोबत ४६ चेंडूंत ७९ धावांची वेगवान भागीदारी केली. १२व्या षटकात रवी बिश्नोईने नरेनला बाद करून ही जोडी फोडली. यानंतर लखनौने ठरावीक अंतराने बळी घेत कोलकाताला अडीचशे धावा उभारण्यापासून रोखले. परंतु, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, कर्णधार श्रेयस अय्यर आणि रमणदीप सिंग यांच्या छोटेखानी फटकेबाजीच्या जोरावर कोलकाताने द्विशतकी मजल मारली. 

 यंदाच्या आयपीएलमध्ये सुनील नरेन-फिल सॉल्ट यांनी सर्वाधिक सहा वेळा ५०हून अधिक धावांची सलामी दिली. आयपीएलच्या एका सत्रात ४००हून अधिक धावा आणि १०हून अधिक बळी अशी दमदार अष्टपैलू कामगिरी करणारा सुनील नरेन हा सातवा क्रिकेटपटू ठरला. आयपीएलमध्ये १५००हून अधिक धावा आणि १५०हून अधिक बळी अशी अष्टपैलू कामगिरी करणारा सुनील नरेन हा रवींद्र जडेजा व ड्वेन ब्रावो यांच्यानंतरचा केवळ तिसरा क्रिकेटपटू ठरला. टी-२० क्रिकेटमध्ये इकाना स्टेडियममध्ये पहिल्यांदाच २००हून अधिक धावा उभारल्या गेल्या. कोलकाताने आयपीएलच्या एकाच सत्रात सर्वाधिक ६ वेळा द्विशतक ठोकण्याच्या मुंबईच्या विक्रमाशी केली बरोबरी.

टॅग्स :आयपीएल २०२४