नवी मुंबई : पुन्हा एकदा फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी कच खाल्ल्याने मुंबई इंडियन्सने हातातील सामना गमावला. कोलकाता नाइट रायडर्सने दिलेले १६६ धावांचे लक्ष्य गाठताना मुंबईचा डाव केवळ ११३ धावांमध्ये संपुष्टात आल्याने त्यांना ५२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि आंद्रे रसेल यांनी मुंबईला हादरे दिले. जसप्रीत बुमराहने १० धावांमध्ये ५ बळी घेत कोलकाताला मर्यादित धावसंख्येत रोखले. मात्र, मुंबईच्या फलंदाजांना त्याचा फायदा घेता आला नाही. यासह कोलकाताने बाद फेरीच्या आशा कायम राखल्या.
धावांचा पाठलाग करताना मुंबईने पहिल्याच षटकात रोहित शर्माचा बळी गमावला. यानंतर ठरावीक अंतराने मुंबईचे फलंदाज बाद झाले. बघता बघता १०० धावांमध्ये मुंबईने अर्धा संघ गमावला. सलामीवीर इशान किशनने एकाकी झुंज देताना अर्धशतक ठोकले. मात्र, त्याला अपेक्षित साथ लाभली नाही. त्याआधी मधली फळी कोलमडल्याने आक्रमक सुरुवातीनंतरही कोलकाताची वाटचाल मर्यादित राहिली. बुमराहने कोलकाताच्या फलंदाजीला सुरुंग लावला.
अजिंक्य रहाणे-व्यंकटेश अय्यर यांनी ३४ चेंडूंत ६० धावांची तडाखेबंद सलामी दिली. कुमार कार्तिकेयने अय्यरला बाद करत ही जोडी फोडली आणि कोलकाताची धावगती मंदावली. नितीश राणामुळे कोलकाताने समाधनकारक मजल मारली. ३३ धावांमध्ये ६ बळी गमावल्याने कोलकाताचा डाव २ बाद १२३ धावांवरून ८ बाद १५६ धावा असा गडगडला. बुमराहने १८वे षटक निर्धाव टाकताना ३ बळीही घेतले. कार्तिकेयने २, तर डॅनियल सॅम्स आणि मुरुगन अश्विन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
सूर्यकुमार आयपीएल बाहेरमुंबई इंडियन्सचा भरवशाचा फलंदाज सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएल सत्रातून बाहेर झाला आहे. यंदा सूर्यकुमारने ८ सामन्यांतून ३ अर्धशतक झळकावताना ३०३ धावा केल्या. आयपीएलने प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली की, '६ मेला गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवला दुखापत झाली होती. त्याच्या डाव्या हाताच्या मांसपेशी ताणल्या गेल्या आहेत. तो यंदाच्या सत्रातून बाहेर झाला आहे. बीसीसीआयच्या वैद्यकिय पथकाने त्याची तपासणी केल्यानंतर त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.'
n टी-२० क्रिकेटमध्ये २५० सामने खेळणारा मुंबई इंडियन्स आयपीएलमधील पहिला संघ ठरला. n आयपीएलमध्ये जसप्रीत बुमराहने पहिल्यांदाच ५ बळी घेण्याची कामगिरी केली. n मुंबई इंडियन्सकडून ५ बळी घेणारा बुमराह पाचवा गोलंदाज ठरला.n आयपीएलमध्ये एकाच षटकात एकही धाव न देता ३ बळी घेणारा बुमराह पाचवा गोलंदाज ठरला.