मुंबई : भारतामध्ये पहिल्यांदाच दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील हा सामना कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर होणार आहे. पण एका गोष्टीसाठी इडन गार्डन्स बदनाम आहे. त्यामुळे हा सामना सुरळीत होणार का, याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पण ही गोष्ट नेमकी आहे तरी काय...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदावर विराजमान होताच माजी कर्णधार सौरव गांगुलीनं टीम इंडियानं डे-नाईट कसोटी खेळावी असा प्रस्ताव ठेवला होता. त्यादृष्टीनं पाऊलं उचलताना बीसीसीआयनं कोलकाता येथे होणारी कसोटी डे नाईट खेळवावी असा प्रस्ताव बांगलादेश क्रिकेट मंडळाकडे पाठवला होता. बांगलादेश क्रिकेट मंडळाचे चेअरमन अक्रम खान यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण, याबाबत अद्याप विचार केला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. पण, मंगळवारी बांगलादेश क्रिकेट मंडळानेही डे-नाईट कसोटी खेळण्यावर सहमती दर्शवली.
आता भारतातील पहिला दिवस-रात्र सामना इडम गार्डन्सवर होणार आहे. पण हे मैदान 'बत्ती गुल' होण्यासाठी बदनाम समजले जाते. कारण आतापर्यंत बऱ्याचदा या मैदानातील लाईट्स सामना सुरु असताना गेलेल्या पाहायला मिळाल्या आहेत.
आयपीएलचा 2008 साली सामना डेक्कन चार्जर्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये होणार होता. पण या सामन्यात अचानक लाईट्स गेल्या आणि 25 मिनिटांसाठी सामना थांबवण्यात आला होता. त्यानंतर 24 डिसेंबर 2009 या दिवशी भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवण्यात आला होता. त्यावेळीही लाईट्स गेल्यामुळे 15 मिनिटांसाठी खेळ थांबवला गेला होता. आयसीसीच्या ट्वेन्टी-20 क्रिकेट विश्वचषकातील एका सामन्यातही अशीच गोष्ट पाहायला मिळाली. 27 मार्च 2016 ला बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील ट्वेन्टी-20 क्रिकेट विश्वचषकातील सामना खेळवला गेला होता. हा सामना सुरु असतानाही लाईट्स बंद पडल्या होत्या. त्यामुळे 10 मिनिटांचा खेळ वाया गेला होता.
हा सामना दिवस-रात्र असल्यामुळे या लढतीच्या तिकीटी महाग असतील, असे चाहत्यांना वाटत आहे. त्यामुळे बंगाल क्रिकेट असोसिएशनने या सामन्याच्या तिकिटांचे दर किती ठेवले आहेत, याबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील कोलकात्यामध्ये होणारा कसोटी सामना दिवस-रात्र खेळवण्यात येणार आहे. या स्टेडियमची क्षमता 68 हजार आहे. भारतातील सर्वात मोठे स्टेडियम म्हणून ईडन गार्डन्सचे नाव घेतले जाते. पण आता पहिल्याच दिवस-रात्र कसोटीला चाहत्यांचा कसा प्रतिसाद मिळतो, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. त्यामुळे बंगाल क्रिकेट असोसिएशनने या सामन्याचे दर फारच कमी ठेवले आहेत. या सामन्याची कमीत कमी 50 रुपयांमध्ये तिकिट मिळू शकते. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सचिव अभिषेक दालमिया यांनी ही माहिती दिली.
दालमिया म्हणाले की," आम्ही 2.30 वाजता नाही तर 1.30 ला सामना सुरु करणार आहोत. त्यामुळे हा सामना 8.30 ला संपू शकेल. चाहत्यांनी लवकर घरी जाण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे. या सामन्याचे तिकीट दर 50, 100, 150 रुपये असे ठेवण्यात आले आहेत.
भारताचा कसोटी संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धीमान साहा ( यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुबमन गिल, रिषभ पंत.
14 ते 18 नोव्हेंबर - पहिली कसोटी, इंदूर22 ते 26 नोव्हेंबर - दुसरी कसोटी, कोलकाता