सध्या कसोटी क्रिकेटमध्ये एकामागून एक विक्रम रचणारा इंग्लंडचा दिग्गज सलामीवीर अॅलिस्टर कुक याने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवताना सलग १५३ कसोटी सामने खेळण्याचा अॅलन बॉर्डर यांच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे.लंडन : इंग्लंडचा माजी कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज अॅलेस्टर कुक याने गुरुवारी येथे सलग १५३ कसोटी सामने खेळून आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅलन बॉर्डरच्या विक्रमाची बरोबरी साधली.पाकिस्तानविरुद्ध लॉर्डस् येथे आजपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात कुकचा हा कसोटीतील सलग १५३ वा सामना आहे. कुकचा हा एकूण १५५ वा कसोटी सामना आहे. कुकने २00६ मध्ये भारताविरुद्ध नागपूर येथे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि याच सामन्यात त्याने शतकदेखील झळकावले होते; परंतु आजारी पडल्यानंतर तो मालिकेतील अखेरचा कसोटी सामना खेळू शकला नव्हता. तथापि, त्यानंतर कुकने इंग्लंडकडून प्रत्येक कसोटी सामना खेळला आहे. त्याच्या नावावर १२ हजारांपेक्षा जास्त कसोटीतील धावा आहेत. बॉर्डरने जेव्हा त्याचा १५३ वा कसोटी सामना खेळला होता तेव्हा तो ३८ वर्षांचा होता, तर कुक सध्या ३३ वर्षांचा आहे. कुकची ही कामगिरी उल्लेखनीय असल्याचे बॉर्डरने म्हटले आहे. कुकच्या विक्रमाविषशी बोलताना बॉर्डरने म्हटले की, ‘एखादा फलंदाज सलग कसोटी सामने खेळून माझ्या विक्रमानजीक पोहोचेल, याचा मला विश्वास वाटत नव्हता; परंतु हे जबरदस्त आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून कुकचा चाहता आहे.’तथापि, कुकला सध्या चांगला सूर गवसलेला नाही. मेलबोर्न येथे आॅस्ट्रेलियाविरुद्ध २४४ धावा फटकावल्यानंतरही पाकिस्तानविरुद्ध २२दोन सामन्यांत चांगली कामगिरी करण्याचा त्याच्यावर खूप दबाव आहे.सलग सर्वाधिक कसोटी सामने खेळण्यामध्ये विक्रम कुक आणि बॉर्डर यांच्यानंतर आॅस्ट्रेलियाचा मार्क वॉ (१0७), भारताचा दिग्गज सुनील गावसकर (१0६) आणि न्यूझीलंडचा ब्रॅण्डन मॅक्युलम (१0१) यांचा क्रमांक लागतो. (वृत्तसंस्था)पाकिस्तानविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटीत अॅलेस्टर कुकने अर्धशतक ठोकले. मात्र त्यानंतरही इंग्लंडचा पहिला डाव १८४ धावांमध्ये संपुष्टात आला. कुकने सर्वाधिक १४८ चेंडूंत १४ चौकारांसह ७0 धावा केल्या. बेयरस्टॉने (२७) आणि अष्टपैलू बेन स्टोक्स (३८) यांनीही झुंजार खेळी केली. कर्णधार जो रुट (४), मार्क स्टोनमन (४), डेव्हिड मलान (६) व जोस बटलर (१४) यांना स्वस्तात बाद करत पाकिस्तानने इंग्लंडचे कंबरडे मोडले. पाकिस्तानकडून मोहम्मद अब्बास (४/२३) व हसन अली (४/५१) यांनी भेदक मारा केला. यानंतर पहिल्या दिवसअखेर पाकिस्तानने १ बाद ५० धावा अशी दमदार मजल मारली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- कुकने केली बॉर्डरच्या विक्रमाची बरोबरी
कुकने केली बॉर्डरच्या विक्रमाची बरोबरी
सलग १५३ कसोटी सामने खेळले; भारताविरुद्ध केले होते कसोटी पदार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 12:28 AM