GT vs LSG Live Match । अहमदाबाद : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात आज दोन भावांमध्ये लढाई होत आहे. होय, कारण लोकेश राहुलच्या अनुपस्थितीत कृणाल पांड्या लखनौच्या संघाची धुरा सांभाळत आहे, तर गतविजेता गुजरातचा संघ यंदा देखील हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात चमकदार कामगिरी करत आहे. आजच्या सामन्यासाठी कृणाल पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे गुजरात टायटन्सचा संघ प्रथम फलंदाजी करेल. लखनौच्या संघात आज क्विंटन डिकॉकची एन्ट्री झाली असून नवीन-उल-हक बाकावर असणार आहे.
पांड्या बंधू भावूकआजचा सामना पांड्या बंधूंसाठी खूप खास आहे. कारण आयपीएलच्या इतिहासात प्रथमच दोन बंधू कर्णधाराच्या रूपात आमनेसामने आहेत. स्वप्न सत्यात उतरले असल्याचे कृणालने यावेळी सांगितले. तर आजचा दिवस भावनिक असून माझ्या वडिलांना अभिमान वाटत असेल, असे हार्दिक पांड्याने सांगितले आहे.
आयपीएलचा यंदाचा हंगाम अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. जवळपास सर्वच संघांनी दहा ते अकरा सामने खेळले असून गुणतालिकेत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गतविजेता गुजरातचा संघ १४ गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर ११ गुणांसह लखनौचा संघ तिसऱ्या स्थानी आहे. लखनौच्या संघाला मागील सामन्यात पावसामुळे केवळ एक गुण मिळाला होता. कारण पावसाच्या व्यत्ययामुळे लखनौ आणि चेन्नई यांच्यातील सामना रद्द करावा लागला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"