Join us  

केएस भरत की इशान किशन, WTC फायनलमध्ये कोणाला संधी द्यावी?, हरभजन सिंगने सांगितले नाव!

यष्टिरक्षक इशान किशन किंवा केएस भरत यांच्यामधून एकालाच संधी मिळेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2023 10:37 PM

Open in App

७ ते ११ जून या कालावधीत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमधील ओव्हल मैदानावर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल होणार आहे. भारतीय संघातील खेळाडू कसून सराव देखील करत आरहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी अद्याप टीम इंडियाच्या प्लेइंग ११ बाबत संभ्रम कायम आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी दोन्ही संघांची जोरदार तयारी सुरु आहे. दोन्ही संघांचे खेळाडू इंडियन प्रीमियरमध्ये खेळताना दिसले, आता ते कसोटीच्या फॉरमॅटमध्ये खेळतील. दरम्यान, टीम इंडियाला एकीकडे दुखापतींचं ग्रहण लागलं असताना ऑस्ट्रेलिया विरुद्ध मैदानावर नेमकं कोण उतरणार यावर अजूनही चर्चा सुरु आहे.

यष्टिरक्षक इशान किशन किंवा केएस भरत यांच्यामधून एकालाच संधी मिळेल. एका वर्गाला भरतसारखा यष्टिरक्षक खेळायला हवा आहे, तर ऋषभ पंतसारख्या प्रभावी खेळाडूची मागणी करणाऱ्या दिग्गजांची कमतरता नाही. भारतीय संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंगने देखील डब्ल्यूटीसी फियानलमध्ये इशान किशनला संधी द्यावी, असं मत व्यक्त केलं आहे.

यूट्यूबवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये भज्जीने केएस भरतपेक्षा इशानला प्राधान्य का द्यावे हे स्पष्ट केले. आपल्या युक्तिवादाला बळ देण्यासाठी भज्जीने इशानच्या फलंदाजीबद्दल आणि नवीन चेंडूला सामोरे जाण्याविषयी सांगितले. हरभजन म्हणाला की मला वाटते की या गोष्टीमुळे भारतीय फलंदाजीला अधिक बळ मिळेल कारण ईशान नवीन चेंडू भरतपेक्षा चांगला खेळू शकतो. तो सलामीवीरही आहे आणि चांगल्या फॉर्ममध्येही आहे. 

केएस भरतच्या फलंदाजीवर आपला फारसा विश्वास नसल्याचेही भज्जीने सांगितले. तो म्हणाला की पंत हा आक्रमक फलंदाज आहे आणि ईशानकडेही तेवढीच क्षमता आहे. केएस भरत यष्टीमागे खूप चांगला असला तरी मला त्याच्या फलंदाजीवर फारसा विश्वास नाही. यापूर्वी भज्जीने भरतला इशानपेक्षा जास्त अनुभव असल्याचे सांगत त्याचे समर्थन केले होते. दरम्यान जर ईशान डब्ल्यूटीसी फायनल खेळला तर तो त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिला सामना असेल.

ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढणार!

ऋषभ पंतच्या अनुपस्थितीमुळे भारताला मधल्या फळीत एक्स-फॅक्टरची उणीव भासेल. मधल्या फळीत ऋषभ पंतच्या एक्स-फॅक्टरची कमतरता ईशान किशन भरून काढू शकतो. इशान किशनने निवडकर्त्यांना दाखवून दिले आहे की त्याच्यात मोठी खेळी खेळण्याची ताकद आहे. त्यामुळे त्याच्या संघातील समावेशाने ऑस्ट्रेलियाचे टेन्शन वाढणार हे नक्की.

WTC फायनलसाठी भारतीय संघ- 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान किशन, के.एस. भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट. 

राखीव खेळाडू- यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.  

WTC फायनलसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ- 

पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), स्कॉट बोलँड, मार्नस लाबुशेन, नाथन लायन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, अॅलेक्स कॅरी, कॅमरून ग्रीन, मार्क हॅरिस, जोस हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोस इंग्लिस, उस्मान ख्वाजा, डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क.  

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाइशान किशनभारतीय क्रिकेट संघ
Open in App