मुंबई - भारतीय संघाला एडलेड कसोटीत मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यात कोहलीही रजेवर गेला आणि अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर भारतीय संघाचं नेतृत्व सोपविण्यात आलं. अशा बिकट परिस्थितीवर आणि त्यानंतरही आलेल्या सर्व अडथळ्यांवर मात करुन भारतीय संघानं ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली. भारतीय संघाच्या या विजयाचं कौतुक करताना शब्द अपुरे पडत आहेत. जगभरातील दिग्गजांकडून आणि देशातील पंतप्रधानांपासून ते गाव-खेड्यातल्या सर्वसामान्यांपर्यंत सर्वजण अजिंक्य भारताच्या विराट कामागिरीचं कौतुक करत आहेत.
भारताच्या युवा खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत जो खेळ केला, तो पाहून सर्वच अवाक् आहेत. गॅबावरील अविश्वसनीय विजयानंतर ऑस्ट्रेलियाचे बरेच आजी-माजी खेळाडू सदम्यात गेले आहेत. एडलेडवरील पराभवानंतर अनेकांनी ऑस्ट्रेलिया ही मालिका ४-० अशा फरकाने जिंकेल असा दावा केला. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडिया दुबळी झालीय, असेही अनेकांचे म्हणणे होते. पण, गॅबा कसोटीनंतर ती सर्व मंडळी तोंडावर पडली. यात ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंग आणि पाकिस्तानचावसीम अक्रम यांचाही समावेश आहे,
पाकिस्तानच्या माजी जलदगती गोलंदाज आणि आक्रमक खेळाडू वसीम अक्रमनेही भारतीय संघाचं तोंड भरुन कौतुक केलंय. टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियातील कामगिरीची वाहवा करताना तो जराही कमीपणा दाखवला नाही. 'वा इंडिया वा... अजिंक्य भारताचा अविश्वसनीय कसोटी सामना आणि मालिका विजय पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आजपर्यंत कुठल्याच आशियाई क्रिकेट संघात भारतीय संघासारखा हा धाडसी बाणा आणि धैर्यवान लढा दिसून आला नाही. फ्रंटलाईन खेळाडू जखमी झाले, तरी कुठलाच अडथळा भारतीय संघाला विजयापासून रोखू शकला नाही. विशेष म्हणजे 36 धावांवर ऑल आऊट झाल्यानंतरही दुसऱ्या सामन्यातील हा विजय इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचं वसीम अक्रमने म्हटलंय.
रिकी पाँटींग म्हणाला
क्रिकेट.कॉमशी बोलताना पाँटिंग म्हणाला,''ऑस्ट्रेलियाला ही मालिका जिंकता आली नाही, हे पाहून मी स्तब्ध आहे. हा तर भारताचा अ संघ होता आणि कमकुवत संघाकडून ऑस्ट्रेलिया कशी हरली? मागील पाच-सहा आठवड्यांत टीम इंडियानं ज्या संकटांचा सामना केला, ते पाहता हा विजय अविस्मरणीय आहे. कर्णधार मायदेशी परतला आणि दुखापतग्रस्त खेळाडूंसह टीम इंडिया लढली. ऑस्ट्रेलियातर संपूर्ण मजबूत संघासह मैदानावर उतरली होती.'' ''हा भारताचा दुसऱ्या फळीतीलही संघ नव्हता. यात भुवनेश्वर कुमार किंवा इशांत शर्माही नव्हते. रोहितही शेवटच्या दोन सामन्यांत खेळला. टीम इंडियान शानदार खेळ केला. कसोटी क्रिकेटच्या सर्व महत्त्वाच्या क्षणांचा त्यांनी फायदा घेतला, जे ऑस्ट्रेलियाला करता आलं नाही. दोन संघांमधील हा फरक आहे आणि भारत या विजयाचे हकदार आहे,''असेही पाँटिंग म्हणाला.