Join us  

लंकेविरुद्ध उर्वरित दोन सामन्यांसाठी कुलदीप, मनीषला संधी मिळणे गरजेचे

लंकेविरुद्ध उर्वरित दोन सामन्यांसाठी भारतीय व्यवस्थापन संघात काय फेरबदल करते हे पाहणे रंजक ठरणार आहे. हे बदल कसे असतील? भारताने मालिका आधीच खिशात घातली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 1:54 AM

Open in App

- सुनील गावसकर लिहितात...लंकेविरुद्ध उर्वरित दोन सामन्यांसाठी भारतीय व्यवस्थापन संघात काय फेरबदल करते हे पाहणे रंजक ठरणार आहे. हे बदल कसे असतील? भारताने मालिका आधीच खिशात घातली आहे. अशा वेळी प्रयोग करण्याची संघाला संधी असेल. पण प्रयोग करताना संघात संतुलन राखणे तितकेच गरजेचे आहे. प्रयोगाच्या नावावर काहीही करणे योग्य नाही. राखीव बाकावर बसलेल्यांना संधी देण्याच्या प्रयत्नात संघाची विजयी मोहीम डगमगायला लागेल, असा निर्णय कुणी घेणार नाही.पहिल्या तीन वन डेत ज्या चार जणांना बाहेर बसावे लागले, त्यापैकी दोन तर अंतिम ११ जणांत खेळण्याचे प्रबळ दावेदार आहेत. प्रयोगात्मक नव्हे तर चांगले खेळाडू या नात्याने त्यांची दावेदारी सिद्ध होते. मनीष पांडे आणि कुलदीप यादव हे भारतीय संघाचे उज्ज्वल भविष्य ठरतात. अशा युवा कर्तबगार खेळाडूंना बाहेर बसावे लागणे यावरून भारतीय संघ किती बलाढ्य आहे याचा वेध घेता येईल. या दोघांनी वेळोवेळी स्वत:च्या क्षमतेचा परिचय दिला. अधिकाधिक संधी मिळण्याचा त्यांचा हक्कदेखील आहे.मग अजिंक्य रहाणेचे काय? त्याने देखील स्वत:ची ताकद सिद्ध केली. पण धावांचा वेग वाढविण्यात अपयशी ठरल्याच्या नावाखाली त्याला बाहेर बसावे लागले. तो ‘बिग हिटर’ नाही, हे मत चुकीचे आहे. त्याचे हलके फटके आणि काही आगळेवेगळे स्ट्रोक्स धावफलक हलता ठेवण्यास उपयुक्त ठरतात.एखादा नियमित खेळाडू जखमेमुळे बाहेर झाला असेल त्याला पुनरागमनानंतर पहिल्या ११ जणांत स्थान देणे भारतीय संघाचे धोरण आहे. या खेळाडूला अन्य कुठल्या स्थानावर पाठविण्याऐवजी आधीच्या स्थानावर खेळण्याची संधी दिली जावी. पण हे बोलायला सोपे आहे. प्रत्यक्षात काही खेळाडूंवर अन्याय होतो. उदा. रहाणेने विंडीजविरुद्ध चांगली कामगिरी केल्यानंतरही सध्या ११ जणांमधून त्याला बाहेर बसावे लागले. अशा वेळी टीम इंडियाच्या नेतृत्वावर कुणी प्रश्नचिन्ह लावू शकतो. जी व्यक्ती विंडीज दौºयात उपकर्णधार होती, ती राखीव बाकावर बसून आहे. भारतीय संघ विजयी पथावर असल्यामुळे अशा बाबींकडे सध्या लक्ष जाणार नाही, पण ज्या रहाणेने देशासाठी चमकदार कामगिरी केली तो अचानक बाहेर व्हावा, ही बाब तशी चुकीचा संदेश देणारी आहे. (पीएमजी)

टॅग्स :क्रिकेट