कॅनबेरा : कुलदीप यादवला सूर गवसला असून भारतीय संघ त्याला पहिल्या टी-२० मध्ये युजवेंद्र चहलच्या स्थानी संधी देऊ शकतो, असे मत महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी व्यक्त केले. तिसऱ्या वन-डेमध्ये चहलच्या स्थानी खेळत असलेल्या कुलदीपने मधल्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे भारतीय संघाल ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखण्यास मदत झाली. कुलदीपने आपल्या १० षटकांच्या कोट्यामध्ये ५७ धावा दिल्या आणि ग्रीनला तंबूचा मार्ग दाखविला.
गावसकर म्हणाले, ‘कुलदीप फॉर्मात असल्याचे दिसत आहे. त्याने प्रदीर्घ कालावधीनंतर गोलंदाजी केली. माझ्या मते भारतीय संघ त्याला किमान पहिल्या टी-२० सामन्यात संधी देत त्याची चाचणी घेऊ शकतो.’गावसकर यांना वाटते की हार्दिक पांड्या टी-२० मध्ये दोन-तीन षटके गोलंदाजी करू शकला तरी ते भारतासाठी लाभदायक ठरेल. गावसकर म्हणाले,‘जर टी-२० मध्या हार्दिक दोन षटकेही टाकू शकला तरी अन्य गोलंदाजांवरील दडपण कमी होईल आणि कोहलीकडे पर्यायही उपलब्ध होईल.’