कोलकाता : ‘चायनामॅन’ गोलंदाज कुलदीप यादवने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून (केकेआर) अंतिम एकादशमध्ये संधी मिळत नसल्याबद्दल संघ व्यवस्थापनावर मोठे आरोप केले आहेत.
माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राच्या यूट्यूब चॅनेलवर एका मुलाखतीदरम्यान कुलदीप म्हणाला, ‘संघात संवादाचा अभाव आहे. खेळाडूला खेळण्याची संधी का मिळत नाही आणि त्याला कोणत्या सुधारणा कराव्या लागतात, हेदेखील सांगितले जात नाही. संघामधून का वगळण्यात आले हेदेखील त्याला माहीत नसते. जर प्रशिक्षकाने आधी तुमच्यासोबत काम केले असेल आणि तुमच्याशी दीर्घकाळ जुळले असतील तर ते तुम्हाला अधिक चांगले समजून घेतील; पण जेव्हा संवाद कमकुवत होतो तेव्हा अनेक समस्या असतात. तुम्ही खेळत आहात का किंवा संघ तुमच्याकडून काय अपेक्षा करतो, हे तुम्हाला माहीत नसते.’
- ‘कधीकधी तुम्हाला वाटते की, तुम्ही खेळायला पात्र आहात आणि संघासाठी सामने जिंकू शकता; पण तुम्हाला का वगळण्यात आले याचे कारण माहीत नसते. संघ व्यवस्थापन केवळ दोन महिन्यांसाठी योजना आखते. यामुळे अडचणीत भर पडत आहे.
- ‘कुलदीप भारतीय संघात का नाही याबद्दल बरीच चर्चा होते, पण केकेआर फ्रॅन्चायजीबाबत असे होत नाही. आयपीएलपूर्वी संघ व्यवस्थापनाशी मी बोललो; पण सामन्यादरम्यान माझ्याशी याबद्दल कोणीही बोलले नव्हते,’ असेही कुलदीप म्हणाला.