मुंबई - चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात हॅट्ट्रिक घेतली आणि भारतीयांसह संपुर्ण क्रिकेटविश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडलं. नववा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळणा-या कुलदीप यादवने संपुर्ण सामना आपल्याबाजूने फिरवला ज्यामुळे भारतीय संघाला ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवणं सोपं झालं. एकेकाळी ऑस्ट्रेलिया संघाची अशीच दाणादाण उडवून देणा-या हरभजन सिंगलाही कुलदीप यादवच्या गोलंदाजीने भुतकाळात नेऊन ठेवलं. याच मैदानावर ऑस्ट्रेलिया संघाविरोधात 2001 रोजी कसोटी सामन्यात हरभजन सिंगने हॅट्ट्रिक घेतली होती. अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज होता. त्या संपुर्ण मालिकेत हरभजन सिंगने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर फक्त भारतीय संघात आपलं स्थान पक्क केलं नाही, तर महान गोलंदाजांच्या पंक्तीत जाऊन बसला. 16 वर्षानंतर कुलदीप यादवदेखील अशाप्रकारे आपलं स्थान पटकावण्यास सज्ज झाला आहे.
पीटीआयसोबत केलेल्या बातचीतमध्ये हरभजन सिंगने सांगितलं आहे की, 'तोच विरोधी संघ, तोच क्षण, तेच मैदान आणि त्याच वयाचा दुसरा स्पिनर. जेव्हा मी कुलदीप यादवला गोलंदाजी करताना पाहत होतो तेव्हा मला 2001 रोजी कोलकातामध्ये खेळला गेलेला कसोटी सामना आठवत होता. हा एक मोठा रेकॉर्ड आहे'. पुढे बोलताना त्याने सांगितलं की, 'एक तरुण स्पिनर म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात करता तेव्हा सुरुवातीच्या काळातच हॅट्ट्रिक मिळाली तर तुमचा आत्मविश्वास दुपटीने वाढतो. हा एक असा रेकॉर्ड आहे जो प्रत्येक खेळाडूला आयुष्यभर जपून ठेवावासा वाटतो'. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातशेहून अधिक विकेट घेणा-या हरभजन सिंगने सांगितलं की, 'ईडन गार्डन कधीच कोणाला मोकळ्या हाती परत पाठवत नाही. हा रेकॉर्ड क्रिकेट इतिहासात नेहमी लक्षात ठेवला जाईल'.
22 वर्षीय कुलदीप यादवने केलेल्या खेळीनंतर निवड समितीला एकदिवसीय सामन्यांमध्ये आर अश्विन आणि रविंद्र जाडेजाला आणताना अडचण निर्माण होईल असं हरभजनने सांगितलं आहे. जेव्हा हरभजन सिंगला विचारण्यात आलं की, संघातील दुसरा गोलंदाज युजवेन्द्र चहलदेखील चांगली गोलंदाजी करत असताना आर अश्विन आणि रविंद्र जाडेजाला पुन्हा संघात आणणं किती आव्हानात्मक असेल तेव्हा त्याने सांगितलं की, 'हे नेहमीच आव्हानात्मक असणार आहे. जर तुमचे सध्याचे दोन स्पिनर चांगली कामगिरी करत असतील तर वरिष्ठ स्पिनर्सना संघात स्थान मिळणं कठीण होऊन जातं. अश्विन आणि जाडेजासाठी पुनरागमन करणं खूपच आव्हानात्मक असणार आहे. सध्या कुलदीप आणि चहल चांगल्या पद्धतीने खेळत असून त्यांना बदलण्याची गरज मला वाटत नाही. भविष्यात काय होणार आहे याचा अंदाज आपण लावू शकत नाही'.
भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन करताना दुस-या एकदिवसीय सामन्यात विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाचा ५० धावांनी पराभव करुन ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. कुलदीप यादवने घेतलेल्या हॅट्ट्रीकच्या जोरावर भारताने बाजी मारली. प्रथम फलंदाजी करुन २५२ धावा उभारल्यानंतर भारताने आॅसीला ४३.१ षटकात २०२ धावांत गुंडाळले.
Web Title: Kuldeep Yadav and Chawla can be the reason for the two players from the Indian cricket team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.