नवी दिल्ली : भारतीय संघ सध्या वेस्टइंडिजविरूद्ध टी-२० (IND vs WI T20 Series) मालिका खेळत आहे. मालिकेतील शेवटचे दोन सामने अमेरिकेतील फ्लोरिडा येथे पार पडणार असून त्यासाठी दोन्ही संघ अमेरिकेत दाखल झाले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आशिया कप २०२२ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून संघात काही बदल पाहायला मिळाले. कधीकाळी भारतीय गोलंदाजीची एतकर्फी धुरा सांभाळणारी युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांची जोडी यापुढे कधीच एकत्र दिसणार नाही असा दावा माजी क्रिकेटपटूने केला आहे. खरं तर मागील काही कालावधीपासून ही जोडी वेगळी झाली असून अनेकवेळा त्यांना संघातून बाहेर देखील राहावे लागले होते.
भारतीय दिग्गज संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले, "मी मोठ्या कालावधीपासून चहल आणि कुलदीपला एकत्र खेळताना पाहिले नाही. विशेष म्हणजे ही जोडी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकत्र दिसत नाही. माझ्या मते अक्षर पटेल चहलसोबत खेळेल किंवा अश्विन आणि चहलची जोडी मैदानात दिसेल. त्यामुळे चहल आणि कुलदीप एकत्र खेळण्याची संभावना खूप कमी आहे. मला वाटत नाही की कुलदीप आणि चहलची जोडी पुन्हा भारतासाठी एकत्र खेळेल."
एकदिवसीय सामन्यात दिसू शकते जोडीभारतीय गोलंदाजीची फिरकी सांभाळणारी जोडी एक तर अक्षर पटेल आणि चहल किंवा अश्विन आणि चहल यांची असेल. जर चहल फिट नसेल तर कुलदीप यादव एखाद्या सामन्यात खेळताना पाहायला मिळू शकतो. मला चहल आणि कुलदीप पुन्हा एकत्र खेळताना दिसतील असे वाटत नाही. पण कदाचित ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये ते एकत्र दिसतील, असे मांजरेकरांनी अधिक सांगितले.
दुखापतीमुळे कुलदीप यादवचे पुनरागमन लांबणीवर इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) दिल्ली कॅपिटल्स कडून खेळताना कुलदीप यादवने शानदार प्रदर्शन केले होते. त्याने एका हंगामात २१ बळी पटकावून आपली प्रतिभा दाखवून दिली होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेत कुलदीपची फिरकी पाहायला मिळेल अशी आशा होती. मात्र सराव करताना त्याच्या हाताला दुखापत झाली आणि त्याला मालिकेतून बाहेर व्हावे लागले.