तिस-या कसोटीत जडेजाची जागा घेणार कुलदीप यादव, कोहलीने दिले संकेत

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले २ सामने सहज जिंकले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2017 06:48 PM2017-08-11T18:48:11+5:302017-08-11T18:51:28+5:30

whatsapp join usJoin us
kuldeep yadav to play virat kohli clears 3rd test srilanka | तिस-या कसोटीत जडेजाची जागा घेणार कुलदीप यादव, कोहलीने दिले संकेत

तिस-या कसोटीत जडेजाची जागा घेणार कुलदीप यादव, कोहलीने दिले संकेत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पल्लेकल, दि. 11 - विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले २ सामने सहज जिंकले आहेत. जर पल्लेकलमध्ये १२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या व अंतिम कसोटी सामन्यात भारतीय संघ विजयी मोहीम कायम राखण्यात यशस्वी ठरला, तर विदेशात ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप देणारा हा पहिला भारतीय संघ ठरेल. त्यामुळे इतिहास रचण्याची संधी भारतीय संघाकडे आहे. या सामन्यात भारताचा चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तिस-या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहलीने याबाबत संकेत दिले. कुलदीप कोणत्याही परिस्थितीत गोलंदाजी करू शकतो. ऑस्ट्रेलियाविरूद्ध धर्मशाला कसोटीमध्ये त्याने स्वतःला सिद्ध केलं होतं. उद्यापासून सरू होणा-या सामन्यात खेळण्याची त्याला चांगली संधी आहे, असं विराट म्हणाला. 
तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 2-0 ने आघाडी घेतली आहे. आपल्या ८५ वर्षांच्या कसोटी इतिहासात आतापर्यंत विदेशात केवळ एकदा कसोटी मालिकेत ३ सामने जिंकण्याची कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाला आता श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत केवळ ५० वर्षांत या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची संधी प्राप्त झाली नसून, विदेशात प्रथमच सलग ३ कसोटी सामने जिंकण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.
विदेशात क्लीन स्वीपचा विचार केला, तर भारताने आतापर्यंत केवळ बांगलादेश व झिम्बाब्वे यांच्याविरुद्ध अशी कामगिरी केली आहे. पण, या मालिकांत केवळ एक किंवा दोन सामने मर्यादित होते. भारताने २०००मध्ये बांगलादेशाचा एका कसोटी सामन्याच्या मालिकेत १-० ने, तर २००४ व २०१०मध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० ने पराभव केला होता.
भारताने मायदेशात खेळताना यापूर्वी ३ किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप केलेले आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा ४ सामन्यांच्या मालिकेत ४-० ने पराभव केला. मोहंमद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखालील संघाने १९९३-९४ मध्ये इंग्लंड व श्रीलंका या संघांविरुद्ध ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीपची नोंद केली आहे. कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध या पराक्रमाची पुनरावृत्ती केली.
सध्या सुरू असलेल्या मालिकेत भारताने गालेमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा ३०४ धावांनी, तर कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव ५३ धावांनी पराभव केला. फॉर्मचा विचार करता, भारतीय संघ पल्लेकलमध्ये विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून सहभागी होणार आहे.
 
 

Web Title: kuldeep yadav to play virat kohli clears 3rd test srilanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.