कोलंबो : ‘काही सामन्यांतील खराब कमागिरीनंतर आपण कुठेतरी चुकत असल्याची भावना निर्माण होते. जेव्हा कधी एखाद्या खेळाडूकडे मोठ्या कालावधीसाठी दुर्लक्ष केले जाते, तेव्हा त्याला स्वत:च्या क्षमतेवर शंका येऊ लागते,’ असे मत भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याने व्यक्त केले.
इंग्लंडमध्ये २०१९ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत कुलदीपचे संघातील स्थान निश्चित मानले जात होते. मात्र, आता चित्र बदलले आहे. सध्या त्याला मुख्य संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. यंदा इंग्लंडविरुद्धच्या पुण्यात झालेल्या मर्यादित षटकांच्या सामन्यात त्याची कामगिरी निराशाजनक झाली आणि यामुळे त्याच्या संघातील स्थानाला मोठा धक्का बसला. त्या सामन्यात ८४ धावांची खैरात करून त्याला एकही बळी मिळाला नव्हता. मात्र, श्रीलंकेविरुद्ध त्याने ४८ धावांत २ बळी घेत चांगले पुनरागमन केले.
सामन्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कुलदीप म्हणाला की, ‘एक किंवा दोन सामन्यांतील खराब कामगिरीनंतर एखाद्या खेळाडूची कारकीर्द संपत नसते. माझ्या मते, जो कोणी हा खेळ खेळलाय किंवा या खेळाची माहिती ठेवतो, त्याला याची कल्पना असेल. पुण्यातील खेळपट्टी फलंदाजीस अत्यंत पोषक होती. त्यावर फिरकी गोलंदाजांसाठी मदत मिळण्यासारखे काहीच नव्हते. जेव्हा खेळपट्टी तुमच्या गोलंदाजीस पोषक नसते, तेव्हा तुम्ही काहीच करू शकत नाही.’
कोरोनामुळे खेळाडूंना जैव सुरक्षित वातावरणात (बायो-बबल) रहावे लागत आहे. यादरम्यान कुलदीप अनेकवेळा संघाच्या आत-बाहेर होत राहिला. याबाबत त्याने सांगितले की, ‘जैव सुरक्षित वातावरणात राहणे अत्यंत कठीण होऊन जाते.
शिवाय तुम्ही खेळू शकत नसल्याने मानसिक त्रासही होतो. अशावेळी तुम्ही स्वत:च्या क्षमतेवर शंका निर्माण करता. अनेकजण आपली मदत करू इच्छित असतात, आपल्याशी चर्चा करू इच्छितात. जेव्हा अनेकांशी तुम्ही चर्चा करता, तेव्हा नव्या शंका निर्माण होतात.’
राहुल सरांनी मदत केली!
मोठ्या कालावधीनंतर खेळताना दबाव असतो आणि मी अशाच मोठ्या कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळत होतो. तुम्ही चांगले प्रदर्शन करण्यास आतुर असल्याने अशाप्रकारचे दडपण येत असते. सुरुवातीला राहुल सरांनी (राहुल द्रविड) माझ आत्मविश्वास उंचावला. त्यांनी मला खेळाचा आनंद घेण्यास सांगितले आणि मला आनंद आहे की यामुळे मला फायदा झाला. - कुलदीप यादव