मुंबई : कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीला यष्टिमागून अनेकदा गोलंदाजांना मार्गदर्शन करताना आपण पाहिले आहे. त्याच्या मार्गदर्शनामुळे अनेकदा भारताला युवा गोलंदाजांनी यश मिळवून दिले आहे. पण भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवने एका पुरस्कार वितरण सोहळ्यात एक दावा केला होता. त्याच्या म्हणण्यानुसार धोनीच्या बऱ्याच टिप्स चुकीच्या असतात. त्याच्या या वक्तव्याची बरीच चर्चा झाली. बुधवारी कुलदीपनं आपण असं काहीच बोललो नसल्याचा दावा केला.
तो म्हणाला," धोनी अनेकदा आम्हाला यष्टिमागून मार्गदर्शन करत असतो. षटकाच्या मध्येच तो आम्हाला टिप्स देतो. काहीवेळा त्याच्या टिप्स कामी येतात, परंतु अनेकदा त्या चुकीच्या ठरतात. पण चुकीच्या ठरल्या तरी आम्ही त्याला काहीच बोलू शकत नाही. धोनी जास्त बोलत नाही. तो षटक सुरू असताना तो आम्हाला सल्ले देतो.''
या वक्तव्यानंतर कुलदीपवर टीकांचा पाऊस पडला. त्यावर कुलदीनं मी असं बोललोच नाही, असा खुलासा केला. तो म्हणाला,''मीडियाकडून आणखी एका वादाला तोंड फोडण्याचा प्रकार झाला आहे. त्यांना अशी अफवा पसरवण्याची गरज नाही. हे वृत्त चुकीचे आहे. धोनीबद्दल मी काही चुकीचे विधान केलेले नाही. मी माही भाईचा आदर करतो.''