भारतात १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना कोरोना लस घेण्यास बंधनकारक केलं आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंनीही कोरोना लसीचा पहिला डोस नुकताच घेतला. विराट कोहली, शुबमन गिल, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, कुलदीप यादव यांनी हा पहिला डोस घेतला. इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना लसीचा दुसरा डोस लंडनमध्ये देण्यात येणार आहे. भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव ( Kuldeep Yadav) याला कोरोना लस घेणे महागात पडणार आहे. कुलदीपनं कोरोना लसीसाठी अॅपद्वारे बुकींग केली, परंतु त्यानं ही लस त्याच्या गेस्ट हाऊसवरच घेतली. त्याच्यासाठी या VIP ट्रिटमेंटची कानपूर जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू होणार आहे.
कुलदीपनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर कोरोना लस घेतल्याचा फोटो पोस्ट केला होता.
कधी कधी मला धोनीच्या मार्गदर्शनाची उणीव जाणवते - कुलदीप यादव
फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने इंग्लंड दौऱ्यातून वगळल्यानंतर निराश होऊन प्रतिक्रिया दिली. ‘मैदानात यष्टीमागून महेंद्रसिंग धोनीचे मार्गदर्शन मी मिस करतो. त्याच्याकडे अपार अनुभव होता. तो सतत यष्टीमागून मोठ्या आवाजात माझ्यासारख्या गोलंदाजाला मार्गदर्शन करायचा. कधी कधी त्या गोष्टींची आठवण झाली की, पोकळी जाणवते,’ असे मत कुलदीपने व्यक्त केले. कुलदीप म्हणाला, “कधी कधी मला माही भाईच्या मार्गदर्शनाची आठवण येते. ऋषभ पंतने आता धोनीचे स्थान घेतले. तो जितका खेळेल, तितका तो आम्हाला भविष्यात अधिक इनपुट देण्यास सक्षम असेल. मला नेहमीच असे वाटते की, प्रत्येक गोलंदाजाला अशा पार्टनरची आवश्यकता असते, जो खेळपट्टीच्या दुसऱ्या बाजूने प्रतिसाद देईल.”
कुलदीपने २०१९ मध्ये २३ एकदिवसीय सामने खेळले. २०२० आणि २०२१ मध्ये त्याने आतापर्यंत फक्त ७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. कुलदीप पुढे म्हणाला, “जेव्हा धोनी संघात होता, तेव्हा मी व युजवेंद्र चहल खेळत होतो. माही भाई गेल्याने चहल व मी एकत्र खेळलेलो नाही. मला फक्त दहा सामने खेळलो. एकदा मी हॅटट्रिकही घेतली. माझ्या कामगिरीकडे पाहाल, तर त्यात काही उणीव जाणवणार नाही.” आयपीएलमध्ये यंदा एकाही सामन्यात संधी न मिळाल्याबद्दल कुलदीपने मतप्रदर्शन केले. ‘मी फॉर्ममध्ये नाही. संघात फलंदाजी आणि गोलंदाजीत यशस्वी ठरू शकणाऱ्यांना स्थान दिले जाते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर इंग्लंडविरुद्ध फक्त एक कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली,’ असे कुलदीपने सांगितले.