नेपिअर, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारतीय संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. भारताने न्यूझीलंडवर पहिल्या एकदिवसीय सामन्यात सहज विजय मिळवला. त्यापूर्वी ऑस्ट्रेलियामध्येही भारताने ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती. तेव्हापासून आतापर्यंत सर्वात चर्चा सुरु आहे ती चहल टीव्हीची. सामन्यात जो खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करतो, त्याची चहल मुलाखत घेतो. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवने नेत्रदीपक कामगिरी केली होती. त्यामुळे सामन्यानंतर कुलदीपची मुलाखत चहलने घेतली. त्यावेळी कुलदीपने चहलला घरचा अहेर दिल्याचे पाहायला मिळाले.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने यजमान न्यूझीलंडवर आठ गडी राखून मात केली. गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यानंतर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहलीने दमदार फलंदाजी करत भारताचा विजय निश्चित केला. या विजयासह भारतीय संघाने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे.
या सामन्यानंतर दिलेल्या मुलाखतीमध्ये कुलदीप म्हणाला की, " चहल टीव्ही साऱ्यांनी प्रोत्साहन द्या, प्रेम करा. कारण चहल ही एक चांगली व्यक्ती आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये नवीन खेळाडू येत राहतील. हे चॅनेल फार मोठे करा, कारण चहलने क्रिकेट सोडल्यावरही त्याचे हे चॅनेल सुरु राहील."