Kuldeep Yadav IND vs SA 3rd T20: भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव त्याच्या कामगिरीवर खूप खूश आहे. वेग आणि उसळीसाठी प्रसिद्ध असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या विकेट्स सध्याच्या दौऱ्यात फिरकीपटूंसाठीही पोषक ठरताना दिसत आहेत, असे त्याचे मत आहे. कुलदीपने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी२० सामन्यात 17 धावांत 5 बळी घेतले. भुवनेश्वर कुमारनंतर टी२० सामन्यात दुसऱ्यांदा पाच बळींचा टप्पा गाठणार तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. भारताला मालिका वाचवण्यासाठी सामना जिंकणे अनिवार्य होते आणि कुलदीपने त्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
२९वा वाढदिवस साजरा करणाऱ्या कुलदीपच्या शानदार गोलंदाजीमुळे भारताने हा सामना 106 धावांनी जिंकला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. सामन्यानंतर कुलदीप म्हणाला, "माझ्यासाठी वाढदिवस हा खास दिवस ठरला. मी 5 विकेट घेण्याचा कधीच विचार केला नव्हता. मला फक्त संघाला जिंकवायचे होते आणि माझ्यासाठी तेच जास्त महत्त्वाचे होते. मला माझ्या गोलंदाजीची थोडी काळजी वाटत होती कारण मी अशा पिचवर बरेच दिवसांनी खेळत होतो आणि त्यामुळे मला लय मिळवायची होती. मला योग्य वेळी गोलंदाजीची लय मिळाली. चेंडू हातातून चांगला सुटत होता आणि परिस्थितीही काही प्रमाणात फिरकीपटूंना मदत करत होती."
कुलदीपने सांगितलं 'सीक्रेट'
कुलदीप म्हणाला, "खरं सांगायचं तर फिरकीपटूंसाठी विकेट खूप चांगली होती. यशाचं सीक्रेट सांगायचं झालं तर या विकेट्सची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे चेंडू पिच केल्यानंतर खूप वेगाने येत होता. म्हणूनच कधी-कधी तुमची 'व्हेरिएशन' तुम्हाला योग्य ठेवावी लागते आणि ती लय बरोबर मिळाली तर फलंदाजाला खेळणे सोपे जात नाही. तेच मी केलं आणि मला फायदा मिळाला."