नवी दिल्ली : भारताचा युवा फिरकीपटू कुलदीप यादवने बऱ्याच कमी वेळात जास्त प्रसिद्धी मिळवली आहे. एक हॅट्ट्रिकही त्याच्या नावावर आहे. आपल्या चायनामन गोलंदाजीने त्याने भल्या भल्या फलंदाजांना चांगलेच नाचवले आहे. ही झाली त्याची मैदानातली कामगिरी. पण मैदानाबाहेर मात्र त्याला बऱ्याच गोष्टी आवडतात. त्याने आपल्या मनात ' ड्रीम गर्ल ' चे चित्रही रेखाटले आहे. बॉलीवूडमधली ' ही ' अभिनेत्री माझी ' ड्रीम गर्ल ' आहे, असे त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. आणि तिच्याबरोबर त्याला एका निर्जन बेटावर जाऊन सैर करायची आहे.
कुलदीपला क्रिकेटबरोबर फुटबॉल, टेबल टेनिस हे खेळ आवडतात. त्याचबरोबर त्याला चित्रपट पाहायलाही आवडते. बॉलीवूडचा किंग शाहरुख खान हा त्याचा आवडता अभिनेता आहे. शाहरुखबरोबर चित्रपटात काम करण्याची कुलदीपची इच्छा आहे.
कुलदीप सर्वात जास्त प्रेमात आहे तो श्रीलंकेची माजी मिस युनिवर्स आणि बॉलीवूडमधली अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीसच्या. जॅकलिनवर तो एवढा फिदा आहे की, त्याला तिला एकदा भेटायचे आहे. फक्त एवढ्यावर कुलदीप थांबणारा नाही. कारण त्याने जॅकलिनबरोबर एका निर्जन बेटावर जायचे असल्याची मनातली सुप्त इच्छाही व्यक्त केली आहे.