कोलकाता : भारताविरुद्ध २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अँजेलो मॅथ्यूज जखमी असल्याने त्याची उणीव आम्हाला परभवाच्या खाईत लोटून गेली, असे मत श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा याने व्यक्त केले आहे.
मुंबईत वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात लंकेचा सहा गडी राखून पराभव करीत भारताने २८ वर्षानंतर पुन्हा एकदा विश्वचषक जिंकला होता. न्यूझीलंडविरुद्ध रोमहर्षक उपांत्य सामन्यात मोलाची भूमिका बाजवणाऱ्या मॅथ्यूजला मांसपेशी ताणल्या गेल्याने वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या निर्णायक लढतीतून बाहेर व्हावे लागले होते. ‘मॅथ्यूजच्या जखमेमुळे आम्हाला ६-५ अशा संयोजनासह उतरावे लागले शिवाय नाणेफेक जिंकून फलंदाजी घ्यावी लागली. मागे वळून पाहतो तेव्हा मला ही बाब प्रकर्षाने जाणवते.
एखादा झेल सुटणे हे समजू शकतो, मात्र महत्त्वाच्या सामन्यात संघाचे संयोजन बिघडणे किती नुकसानदायी ठरते, हे सामना गमावल्यानंतर ध्यानात आले,’ असे संगकाराने आॅफस्पिनर रविचंद्रन अश्विन याच्यासोबत इन्स्टाग्राम चॅटवर सांगितले. त्या सामन्यात लंकेकडून माहेला जयवर्धने याने नाबाद १०३ तर भारतातर्फे गौतम गंभीरने ९७ आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने नाबाद ९१ धावा ठोकल्या होत्या. संगकारा पुढे म्हणाला, ‘मॅथ्यूज फिट असता तर आम्ही लक्ष्याचा पाठलाग करणे पसंत केले असते.
यामुळे निकाल फिरला असता असा मी दावा करणार नाही मात्र मॅथ्यूज सातव्या स्थानावर फलंदाजी करून बोनस धावा देऊ शकला असता. संपूर्ण विश्वचषकावर नजर टाकल्यास मॅथ्यूजची गोलंदाजी आणि फलंदाजीतील कामगिरी आमच्यासाठी लाभदायी ठरली होती, असेही संगकाराने यावेळी सांगितले. (वृत्तसंस्था)
का झाली दोनदा नाणेफेक...
सामन्याच्या नाणेफेकीसाठी धोनी आणि कुमार संगकारा हे मैदानावर आले, तेव्हा न्यूझीलंडचे जेफ क्रो हे सामनाधिकारी म्हणून आणि रवी शास्त्री हे समालोचक म्हणून तेथे उपस्थित होते. नाणे हवेत उडवण्यात आले तेव्हा कुमार संगकाराने हेड्स असे म्हटले होते. वानखेडे मैदानावरील प्रेक्षकांच्या आवाजामुळे क्रो यांना संगकाराचा आवाज ऐकूच गेला नाही. त्यामुळे काहिसा गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर धोनी आणि संगकारा यांनी चर्चा करून पुन्हा नाणेफेक करण्याचा निर्णय घेतला, त्यात संगकाराने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.‘त्या दिवशी मैदानात खूप जास्त गोंगाट होता. नाणे उडवल्यानंतर धोनीला नीट काही समजले नाही. त्याने मला विचारलं की तू टेल म्हणालास का? त्यावर मी म्हंटले ,‘ मी हेड्स म्हटले आहे.