नवी दिल्ली : कर्णधार विराट कोहली याच्यासोबत झालेल्या मतभेदानंतर चार वर्षांपूर्वी कोच पदावरून दूर झालेले अनिल कुंबळे आणि शैलीदार फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण हे भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या मुख्य कोच पदाच्या शर्यतीत सहभागी होऊ शकतात. सध्याचे कोच रवी शास्त्री यांचा कार्यकाळी टी-२० विश्वचषकासोबतच संपणार आहे. अशावेळी सौरव गांगुली यांच्या नेतृत्वाखालील बीसीसीआय कुंबळे आणि लक्ष्मण यांना मुख्य कोच पदासाठी अर्ज करण्यास सांगू शकते.
कुंबळे हे २०१६-१७ च्या सत्रात भारतीय संघाचे कोच होते. सचिन तेंडुलकर, लक्ष्मण आणि गांगुली यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने त्यांची शास्त्री यांच्याऐवजी कोचपदी नियुक्ती केली होती. चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर कोहलीसोबतचे कुंबळे यांचे मतभेद चव्हाट्यावर येताच कुंबळे यांनी पदाचा राजीनामा दिला.
बीसीसीआय कुंबळे यांच्यासह लक्ष्मण यांच्याशीदेखील संपर्क करण्याच्या तयारीत आहे. लक्ष्मण हे गेल्या काही वर्षांपासून आयपीएलमधील सनरायजर्स हैदराबाद संघाशी जुळलेले आहेत. तरीही कोचपदासाठी कुंबळे हेच प्रबळ दावेदार मानले जातात. सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, ‘अनिल कुंबळे यांनी ज्या स्थितीत पद सोडले ती परिस्थिती सुधारण्याची गरज आहे. प्रशासकांची समिती कोहलीच्या दडपणाखाली आली आणि कुंबळे यांची उचलबांगडी करण्यात आली तो प्रकार योग्य नव्हता.’ कुंबळे किंवा लक्ष्मण हे या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असतील की नाही, यावर पुढील गोष्टी ठरणार आहेत. बीसीसीआयची प्रथम पसंती भारतीय व्यक्तीला कोचपदी विराजमान करणे ही असेल. कुंबळे आणि लक्ष्मण यांना शंभराहून अधिक कसोटी खेळण्याचा अनुभव आहे, विदेशी कोच हा दुसरा पर्याय असेल.
सूत्रानुसार खेळाडू म्हणून चांगला रेकॉर्ड आणि कोचिंग पदाचा अनुभव या दोन्ही अटी निवडीत असतील. विक्रम राठोड यांच्या दावेदारीचे काय, असे विचारताच या सूत्रांचे मत असे होते की, राठोड हे अर्ज करू शकतील. पण भारतीय संंघाचे मुख्य कोचपद भूषविण्यासाठी त्यांच्याकडे तितकी ख्याती नाही. सहायक कोच म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ शकेल.’