नवी दिल्ली : कोरोनामुळे लांबणीवर पडलेलेले आयपीएलच्या १३ व्या सत्राचे आयोजन यंदा होईल, शिवाय प्रेक्षकांविनादेखील चाहते या स्पर्धेला अधिक लोकप्रिय करतील, अशी आशा माजी भारतीय कर्णधार आणि किंग्स इलेव्हन पंजाबचे मुख्य कोच अनिल कुंबळे याने व्यक्त केली आहे. बीसीसीआय या लीगचे आयोजन आॅक्टोबरमध्ये करण्यास उत्सुक आहे.
स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट कनेक्टेड कार्यक्रमात कुंबळे म्हणाला,‘यंदा आयपीएल आयोजनाप्रति आम्ही आश्वस्त आहोत. यासाठी क्रिकेट वेळापत्रक अतिशय व्यस्त करावे लागेल. कोरोनाच्या संकटात प्रेक्षकांविना सामन्याचे आयोजन करायचे झाल्यास सामने तीन किंवा चार ठिकाणी व्हायला हवेत. आयपीएलच्या आयोजनाबाबत मी अद्याप आश्वस्त आहे.’
व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला,‘ आयपीएलशी जुळलेले हितधारक सामन्यांचे आयोजन अनेक स्टेडियम उपलब्ध असलेल्या शहरात करू शकतात. यामुळे खेळाडूंना प्रवास टाळता येईल.
यंदा आयपीएल होईल अशी शक्यता आहे. सद्यस्थितीत प्रवास करणे अवघड असल्यामुळे तीन-चार स्टेडियम उपलब्ध असलेल्या शहरात आयपीएल सामन्यांचे आयोजन व्हायला हवे. विमानतळावर येणाऱ्या समस्या टाळण्यासाठी एकाच शहरात सामने आयोजित करण्याच्या प्रस्तावावर बीसीसीआय आणि फ्रॅन्चायसींनी भर द्यायला हवा, असे माझे मत आहे.’ (वृत्तसंस्था)