मोहाली : लोकेश राहुलने केलेल्या आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतकी खेळीच्या बळावर आर. आश्विनच्या नेतृत्वाखालील किंग्ज इलेव्हन पंजाबने रविवारी झालेल्या आयपीएल लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्स संघावर ६ गडी आणि ६ चेंडू राखून मात करीत आपणच किंग असल्याचे सिद्ध केले.
लोकेश राहुलच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने विजयासाठी १६७ धावांचे लक्ष्य १८.५ षटकांत ४ गडी गमावून गाठले. पंजाबकडून लोकेश राहुलने दिल्लीच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत १६ चेंडूंतच ६ षटकार आणि ४ चौकारांसह ५१ धावांचा पाऊस पाडला. करुण नायरने ३३ चेंडूंत ५ चौकार, २ षटकारांसह ५0 धावा केल्या. डेव्हिड मिलरने २४ व मार्कस स्टोईनिसने नाबाद २२ धावा केल्या. विजयाचा पाठलाग करताना लोकेश राहुलने आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकताना मयंक अग्रवाल याच्या साथीने २0 चेंडूंतच ५८ धावांची सलामी दिली. आपल्या आक्रमक अर्धशतकी खेळीत राहुलने विशेषत: फिरकी गोलंदाज अमित मिश्रा याचा समाचार घेताना त्याच्या पहिल्याच षटकात २४ धावा वसूल केल्या. त्यात त्याने २ षटकार व ३ चौकार ठोकले. तो बाद झाल्यानंतर मिलर व स्टोईनिस यांनी ४१ धावांची भागीदारी करीत पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
त्याआधी कर्णधार गौतम गंभीरच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने ७ बाद १६६ धावा केल्या. पंजाबचा कर्णधार आर. आश्विनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अफगाणिस्तानच्या १७ वर्षीय आॅफस्पिनर मुजीब उर रहमान याचा संघात समावेश केला, जो की आयपीएलमध्ये खेळणारा सर्वात युवा खेळाडू बनला आहे. कर्णधार गौतम गंभीरने धावबाद होण्याआधी ४२ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ५५ धावा केल्या. यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत यानेदेखील २८ धावांचे योगदान दिले, तर ख्रिस मॉरीस २७ धावांवर नाबाद राहिला. पंतने १३ चेंडूंत ४ चौकार व एक षटकार ठोकला, तर मॉरीसच्या १६ चेंडूंच्या खेळीत एक चौकार व एका षटकाराचा समावेश होता. रहमानने २८ धावांत २ धावा करीत क्षेत्ररक्षणातही चमक दाखवताना गंभीरला धावबाद केले. मोहितनेदेखील ३३ धावांत २, तर आश्विन आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलकदिल्ली डेअरडेव्हिल्स : २0 षटकांत ७ बाद १६६.(गौतम गंभीर ५५, ऋषभ पंत २८, ख्रिस मॉरीस नाबाद २७. मोहित शर्मा २/३३, मुजीब उर रहमान २/२८, आर. आश्विन १/२३, अक्षर पटेल १/३५).किंग्ज इलेव्हन पंजाब : १८.५ षटकांत ४ बाद १६७.लोकेश राहुल ५१, करुण नायर ५0, डेव्हिड मिलर नाबाद २४, स्टोईनिस नाबाद २२. डॅनियल ख्रिस्टियन १/१२, आर. टष्ट्वेटिया १/२४, ख्रिस मॉरीस १/२५, ट्रेंट बोल्ट १/३४).
KXIP vs DD, Live Updates -
07:25PM - पंजाबने दिल्लीचा सहा विकेटने केला पराभव
07:00PM - पंबाजला विजयासाठी 30 चेंडूत 35 धावांची गरज
- युवराज बाद झाल्यानंतर करुण नायरने डावाची सुत्रे आपल्या हाती घेतली. नायरने 32 चेंडूत 50 धावा केल्या.
सध्या डेविड मिलर 18 चेंडूत 18 धावांवर खेळत आहे.
06:39PM - पंजाबला तिसरा धक्का, युवराज बाद
- युवराजने 22 चेंडूमध्ये 12 धावांची खेळी केली. पंजाबला विजयासाठी 64 चेंडूत 70 धावांची गरज आहे. करुण नायर (27) आणि डेविड मिलर मैदानावर आहेत.
06:35 PM - करुन नायरने शमीच्या एकाच षटकात लगावले सलग तीन चौकार, 9 षटकामंतर पंजाब दोन बाद 97 धावा
06: 31PM - पंजाब भक्कम स्थितीत, सर्व मदार युवराजवर
- के. राहुल 51 धावांवर बाद झाल्यानंतर सामन्याची सर्व सुत्रे अनुभवी युवराजने आपल्या हाती घेतली. पंजाबला विजयासाठी 68 चेंडूत 74 धावांची गरज. युवराज 19 तर करुण नायर 23 धावांवर खेळत आहे.
06:09PM - के. एल. राहुलने ठोकले आयपीएलमधील सर्वात जलद अर्धशतक, चार षटकानंतर पंजाबने एक बाद 63 धावा केल्या आहेत.
राहुलने पिहिल्या चेंडूपासून दिल्लीच्या गोलंदाजांना फोडून काढंले. पहिल्या षटकात त्याने 16 धावा वसूल केल्या. दुसऱ्या षटकात 12 आणि तिसऱ्या षटकात 24 धावा वसूल केल्या. राहुलने 14 चेंडूत चार षटकार आणि सहा चौकारांसह अर्धशतक झळकावलं. पंजाब संघाला मयांक अग्रवालच्या रुपाने पहिला धक्का बसला आहे. मयांक 7 धावा काढून बाद झाला आहे. सध्या युवराज आणि राहुल खेळत आहेत. चार षटकानंतर पंजाबने एक बाद 63 धावा केल्या आहेत. चार षटकानंतर पंजाबने एक बाद 63 धावा केल्या आहेत.
05:57PM : पहिल्या षटकात राहुलने ठोकल्या 16 धावा.
-के.एल. राहुल आणि मयांक अग्रवालने पंजाबच्या डावाची केली सुरुवात. ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच षटकात के. एल. राहुलने 16 धावा मारत डावाची झक्कास सुरुवात केली.
05:50PM : दिल्लीचे पंजाबसमोर 167 धावांचे आव्हान, दिल्लीने निर्धारित 20 षटकांत सात बाद 166 धावा केल्या
- ख्रिस मॉरिस(27) आणि डॅनियल ख्रिस्टीयन (17) यांनी शेवटच्या तीन षटकांत फटकेबाजी केली. 17-20 या शेवटच्या चार षटकांत 39 धावा वसूल केल्या.
05:45PM : ख्रिस मॉरिस आणि डॅनियल ख्रिस्टीयन यांनी शेवटच्या षटकात फटकेबाजी केली. 19 षटकानंतर दिल्ली सहा बाद 155 धावा
05: 18 दिल्लीची अवस्था गंभीर, सहा गडी माघारी
- एकवेळ सुस्थितीत असणाऱ्या दिल्लीचा अवस्था खराब झाली. पंत, गंभीरनंतर राहुल टेवाटियाही(9) लगेच बाद झाला.
05: 16PM : दिल्लीला मोठा धक्का, कर्णधार गौतम गंभीर बाद
- एकाकी झुंज देणारा गौतम गंभीर धावबाद झाला, गंभीरने 42 चेंडूत 55 धावांची खेळी केली.
05:08 : दिल्लीला चौथा धक्का, रिषभ पंत 13 चेंडूत 28 धावा काढून बाद
- रिषभ पंतने एक षटकार आणि चार चौकर लगावत संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला.
04: 53 PM : गौतम गंभीरचे अर्धशतक, 12 षटकानंतर दिल्लीच्या तीन बाद 90 धावा
- गंभीरने 36 चेंडूत एक षटकार आणि पाच चौकरांच्या मदतीने झळकावले अर्धशतक.
- विजय शंकरच्या रुपाने दिल्लीला तिसरा धक्का बसला, मोहित शर्माने विजयला 13 धावांवर बाद केलं.
04:40PM - 9 षटकानंतर दिल्लीच्या दोन बाद 70 धावा. कर्णधार गौतम गंभीर 43 धावांवर खेळत आहे.
04:30PM - अक्षर पटेलने दिल्लीला दिला दुसरा धक्का, श्रेयस अय्यर 11 धावांवर बाद
- अक्षर पटेलने श्रेयस अय्यरला बाद करत पंजाबला दुसरे यश मिळवून दिले. सात षटकांत दिल्लीच्या दोन बाद 54 धावा
04:27PM : सहा षटकानंतर दिल्लीने एका गड्याच्या मोबदल्यात 45 धावा केल्या.
कर्णधार गौतम गंभीर 35 धावांवर खेळत आहे. पंजाबकडून मजीब उर रेहमानने कॉलिन मुन्नोला बाद करत पहिले यश मिळवून दिले.
04:22PM : पाच षटकानंतर दिल्लीच्या एक बाद 39 धावा
गौतम गंभीर 17 चेंडूत 29 धावा तर श्रेअस अय्यर चार धावांवर खेळत आहेत.
04: 12PM : दिल्लीला पहिला धक्का, कॉलिन मुन्नो बाद.
(दिल्ली 2.5 षटकानंतर एक बाद 13 धावा) पंजाबचा गोलंदाज मजीब उर रेहमानने कॉलिन मुन्नोला 4 धावांवर बाद केलं.
04: 00PM : दिल्लीकडून गौतम गंभीर आणि कॉलिन मुन्रो सलामीला आले.
03 : 54PM : पंजाबचा कर्णधार आर. अश्विनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं दिल्ली प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.
मोहाली - मोहालीच्या पीसीए स्टेडियमवर आयपीएलमध्ये रविवारी होणाऱ्या पहिल्या लढतीत किंग्स इलेव्हन पंजाब आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सचे संघ आमनेसामने येणार आहेत. या लढतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिलीच्या संघात परतलेला गौतम गंभीर आणि आयपीएलमध्ये पहिल्यांदाच नेतृत्व करत असलेला रविचंद्र अश्विन यांच्यात जुगलबंदी रंगणार आहे. याआधी कोलकाता नाईटरायडर्सला दोन वेळा विजेतेपद मिळवून देणारा गौतम गंभीय यावेळी दिल्ली डेअरडेव्हिल्सचे नेतृत्व करत आहे. त्याची कामगिरी दिल्लीसाठई महत्त्वाची ठरेल. तसेच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि युवा फलंदाज ऋषम पंत यांच्यावरही सर्वांची नजर असेल. दिल्लीच्या संघात अनुभव आणि युवा खेळाडूंचे उत्तम मिश्रण आहे. दुसरीकडे किंग्स इलेव्हन पंजाबला ख्रिस गेल आणि युवराज सिंह या डावखुऱ्या अनुभवी फलंदाजांकडून धडाकेबाज खेळीची अपेक्षा असेल. त्यांचा अनुभव संघाच्या उपयोगी योऊ शकतो. पंजाबच्या संघात अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे त्यांचा अनुभव त्यांच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. प्रतिस्पर्धी संघ - किंग्स इलेव्हन पंजाब - आर. अश्विन (कर्णधार), आरोन फिंच, डेव्हिड मिलर, करुण नायर, मनोज तिवारी, मयांक अगरवाल, अक्षर पटेल, ख्रिस गेल, मंझूर दार, मार्कस स्टॉइनिस, प्रदीप साहू, युवराज सिंग, अक्षदीप नाथ, लोकेश राहुल, अॅड्रू टाय, अंकित राजपूत, बरिंदर सरन, बेन ड्वारशस, मयांक डागर, मोहित शर्मा, मजीब उर रेहमान.दिल्ली डेअरडेव्हिल्स - गौतम गंभीर (कर्णधार), श्रेयस अय्यर, ख्रिस मॉरीस, रिषभ पंत, ग्लेन मॅक्सवेल, जेसन रॉय, कॉलिन मुन्रो, मोहम्मद शामी, कागिसो रबाडा, अमित मिश्रा, पृथ्वी शॉ, राहुल टेवाटिया, विजय शंकर, हर्षल पटेल, अव्हेश खान, शाहबाझ नदीम, डॅनियल ख्रिस्टीयन, जयंत यादव, गुरकिरत सिंग मान, ट्रेंट बोल्ट, मनज्योत कालरा अभिषेक शर्मा, संदीप एल. नमन ओझा, सयन घोष.