इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वात प्ले ऑफच्या शर्यतीतील चौथ्या स्थानासाठीची लढाई अधिक कट्टर होताना दिसत आहे. आतापर्यंत चौथ्या स्थानासाठी आघाडीवर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) टॉप फोरमधून बाहेर फेकला गेला आहे. किंग्स इंलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) सोमवारी विजयाचा 'पंच' मारला आणि १२ गुणांसह चौथ्या स्थानावर झेप घेतली. पंजाबचा हा सलग पाचवा विजय आहे. गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीनंतर मनदीप सिंह आणि ख्रिस गेल यांनी वैयक्तिक अर्धशतकांसह KXIPला ८ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
नाणेफेक जिंकून KXIPनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार लोकेश राहुलनं पहिलंच षटक ग्लेन मॅक्सवेलला टाकायला दिलं आणि त्यानं पहिल्याच चेंडूवर नितिश राणाला ( ०) ख्रिस गेलकरवी बाद केले. त्यानंतर मोहम्मद शमीनं पुढच्याच षटकात राहुल त्रिपाठी ( ७) आणि ३०० वा ट्वेंटी-20 सामना खेळणाऱ्या दिनेश कार्तिकला ( ०) बाद केले. KKRचे तीन फलंदाज १० धावांवर माघारी परतले. कर्णधार इयॉन मॉर्गन आणि शुबमन गिल यांनी चौथ्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. मॉर्गननं २५ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४० धावा केल्या. गिलनं ४५ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकार खेचून ५७ धावा करताना KKRला धीर दिला. ल्युकी फर्ग्युसननं अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना नाबाद २४ धावा करून KKRला ९ बाद १४९ असा समाधानकारक पल्ला गाठून दिला.
प्रत्युत्तरात लोकेश राहुल व मनदीप सिंग यांनी KXIPला ४७ धावांची सलामी करून दिली. ८व्या षटकात वरुण चक्रवर्थीनं KXIPला पहिला धक्का दिला. त्यानंतर मनदीप आणि ख्रिस गेल यांनी KXIPचा डाव सावरताना एकाच सामन्यात समान विक्रम केला. या दोघांनी आजच्या सामन्यात पंजाबकडून १००० धावांचा पल्ला पार केला. मनदीपनं ४९ चेंडूंत,तर गेलनं २५ चेंडूंत अर्धशतक झळकावलं. गेल २९ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारासह ५१ धावांवर बाद झाला. मनदीप ५६ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ६६ धावांवर नाबाद राहिला. पंजाबनं १८.५ षटकांत २ बाद १५० धावा करून विजय पक्का केला.