MI vs KXIP Latest News : दोन गुणांच्या महत्वाच्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबनं ( Kings XI Punjab) पूर्ण जीव ओतून खेळ केला. फॉर्मात असलेल्या मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians) चा विजयरथ अडवून पंजाबनं स्पर्धेतील आव्हान कायम राखले आहे. मुंबई इंडियन्सची सलग पाच सामन्यांतील विजयी मालिका रविवारी KXIPनं खंडीत केली. या विजयाबरोबर पंजाबनं थेट सहाव्या स्थानी झेप घेतली असून प्ले ऑफच्या शर्यतीतील दावेदारी कायम राखली आहे. मुंबईनं १२ गुणांसह दुसरे स्थान कायम राखले आहे. या पराभवाबरोबच मुंबईला एक धक्का बसला आहे. संघातील प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे आणि त्यानं सामना सुरू असताना मैदानही सोडले होते.
मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. क्विटन डी'कॉकनं ४३ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावा किरॉन पोलार्डनं अखेरच्या षटकांत धावा कुटल्या. पोलार्डनं १२ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ३४ आणि कोल्टर-नायलनं १२ चेंडूंत २४ धावा चोपल्या. मुंबई इंडियन्सनं ६ बाद १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात ख्रिस गेल २४ धावा ( १ चौकार व २ षटकार) व निकोलस पूरन १२ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह २४ धावांवर माघारी परतले. ग्लेन मॅक्सवेलचा ( ०) अपयशाचा पाढा याही सामन्यात कायम राहिला. राहुल चहरनं त्याला बाद केले.
१८ व्या षटकात जसप्रीत बुमराहनं सामना फिरवला. त्यानं लोकेश राहुलचा त्रिफळा उडवला. लोकेशनं ५१ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ७७ धावा केल्या. दीपक हुडाचे दोन झेल सोडणं मुंबई इंडियन्सला महागात पडलं. अखेरच्या षटकात पंजाबला विजयासाठी ९ धावांची गरज असताना ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर हुडाचा झेल सुटला. पण, पंजाबला १ धावेवर समाधान मानावे लागले. बोल्टनं पंजाबला ५ बाद १७६ अशा बरोबरीत रोखून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला.
Super Overमध्ये प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाबला जसप्रीत बुमराहनं ५ धावांवर रोखलं. पण, मोहम्मद शमीनंही टिच्चून मारा करताना मुंबई इंडियन्सला ५ धावा करू दिल्या. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सकडून किरॉन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या मैदानावर उतरले. ख्रिस जॉर्डननं दोन वाइड बॉल टाकून मुंबईच्या धावसंख्येत वाढ केली. पण, अखेरच्या चेंडूवर पोलार्डनं टोलावलेला चेंडू अडवून मयांक अग्रवालनं संघासाठी चार धावा वाचवल्या. हाच या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला अन् मुंबईला 1 बाद 11 धावांवर समाधान मानावे लागले. ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचून ख्रिस गेलनं पंजाबवरील दडपण हलकं केलं. त्यानंतर मयांक अग्रवालनं दोन चौकार खेचून पंजाबचा विजय पक्का केला.
या सामन्याच्या १६ व्या षटकात मुंबई इंडियन्सचा मधल्या फळीतील फलंदाज इशान किशन ( Ishan Kishan) दुखापतग्रस्त झाला. संघासाठी एक धाव वाचवण्याकरिता त्यानं डाईव्ह मारली आणि त्याच्या मांडीचे स्नायू ताणले गेले. त्यानं लगेच मैदानाबाहेर जाणं योग्य समजलं. अनुकूल रॉय त्याच्याजागी क्षेत्ररक्षणाला आला. इशानची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत काहीच माहिती मिळालेली नाही. पण, जर ती गंभीर असल्यास मुंबई इंडियन्ससाठी हा मोठा धक्का असू शकतो. इशाननं ७ सामन्यांत १९३ धावा केल्या आहेत. ९९ ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
Web Title: KXIP vs MI Latest News : Ishan Kishan has done his hamstring while sliding for save run, Kishan hobbles off the ground
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.