Join us  

सलग सात अर्धशतकं ठोकत के एल राहुलने मोडला दिग्गजांचा विक्रम

भारताकडून सलग 7 अर्धशतकं ठोकण्याचा विक्रम करणारा राहुल एकमेव फलंदाज आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2017 2:08 PM

Open in App
ठळक मुद्देभारताकडून सलग 7 अर्धशतकं ठोकण्याचा विक्रम करणारा राहुल एकमेव फलंदाज बंगळुरुत ऑस्ट्रेलियाविरोधात खेळल्या गेलेल्या कसोटीपासून राहुलने आपली अर्धशतकांची मालिका सुरु केलीभारताकडून गुंडप्पा विश्वनाथ आणि राहुल द्रविड यांच्या नावावर प्रत्येकी सहा सलग अर्धशतकं ठोकण्याचा विक्रम आहे

पल्लीकल, दि. 12 - श्रीलंकेविरोधातील तिस-या आणि अखेरच्या कसोटी सामन्यातही पराभव करत नवा इतिहास रचण्याच्या उद्देशाने भारतीय क्रिकेट संघ आज मैदानावर उतरला आहे. मात्र त्याआधी के एल राहुलने आपल्या नावे एक नव्या विक्रमाची नोंद करत अनेक दिग्गजांना मागे टाकण्याचा पराक्रम केला आहे. शिखर धवनसोबत ओपनिंग करण्यासाठी उतरलेल्या के एल राहुलने अर्धशतक पुर्ण केलं, आणि सोबत एक नवा विक्रमही केला. के एल राहुलचं हे सलग सातवं अर्धशतक होतं. भारताकडून सलग 7 अर्धशतकं ठोकण्याचा विक्रम करणारा राहुल एकमेव फलंदाज आहे. 85 धावांवर तो आऊट झाला. 

बंगळुरुत ऑस्ट्रेलियाविरोधात खेळल्या गेलेल्या कसोटीपासून राहुलने आपली अर्धशतकांची मालिका सुरु केली. श्रीलंकेविरोधातील शनिवारी ठोकलेलं अर्धशतक हे त्याचं सलग सातवं अर्धशतक ठरलं. भविष्यातील एक मोठा खेळाडू म्हणून के एल राहुलकडे पाहिलं जात असून, त्यानेही वारंवार आपल्यावरील विश्वास सिद्ध करुन दाखवला आहे. 

भारताकडून गुंडप्पा विश्वनाथ आणि राहुल द्रविड यांच्या नावावर प्रत्येकी सहा सलग अर्धशतकं ठोकण्याचा विक्रम आहे. केएल राहुलने दोघांचाही विक्रम मोडीत काढत सलग सात अर्धशतकं ठोकण्याचा विक्रम केला आहे. भारताकडून सलग 7 अर्धशतकं ठोकण्याचा विक्रम करणारा राहुल एकमेव फलंदाज ठरला आहे. 

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशकतं ठोकण्याच्या बाबतीत केएल राहुलने अँडी फ्लॉवर, शिवनारायण चंद्रपॉल, कुमार संगकारा आणि ख्रिस रोजर्स यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. या सर्वांनी सलग 7 वेळा अर्धशतक ठोकलं आहे. त्यामुळे पुढील कसोटी सामन्यातही के एल राहुलने अर्धशतक ठोकल्यास या दिग्गजांनाही मागे टाकण्याचा मान त्याला मिळू शकतो.

सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये श्रीलंकेचा दारुण पराभव करणा-या भारतीय क्रिकेट संघाकडे तिसरा सामना जिंकत इतिहास घडवण्याची नामी संधी आहे. ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर असलेल्या विराट अ‍ॅन्ड कंपनीला श्रीलंकेविरुद्ध तिस-या आणि अखेरच्या कसोटीत विजय नोंदवून परदेशात तीन सामन्यांच्या मालिकेत ‘व्हाईट वॉश’ करण्याची नामी संधी असेल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने श्रीलंकेविरुद्ध ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले २ सामने सहज जिंकले आहेत. जर तिसऱ्या व अंतिम कसोटी सामन्यात भारतीय संघ विजयी मोहीम कायम राखण्यात यशस्वी ठरला, तर विदेशात ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप देणारा हा पहिला भारतीय संघ ठरेल.