Join us  

लाबुशेन, स्मिथचे बळी ठरले टर्निंग पॉइंट

लाबुशेनसारख्या स्थिरावलेल्या फलंदाजाला यष्टिचीत करणे सोपे नसते. पण, जडेजाने ही किमया केली. लाबुशेन ज्या पद्धतीने खेळत होता, त्यावरून तो सामना भारताच्या हातातून हिसकावणार, असेच दिसत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 10:19 AM

Open in App

अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर 

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शानदार कामगिरी करताना पहिल्याच दिवशी पकड मिळवली. याचे श्रेय गोलंदाजांना, विशेष करून रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांना द्यावे लागेल. पहिले दोन बळी झटपट मिळवल्यानंतर मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी ऑस्ट्रेलियाला सावरताना भारतीय गोलंदाजांना दडपणात आणले. मात्र, जडेजाने लाबुशेन आणि स्मिथ यांना बाद करत सामन्याचे चित्रच पालटले. दोघांचे बळी सामन्यातील निर्णायक क्षण ठरले.

लाबुशेनसारख्या स्थिरावलेल्या फलंदाजाला यष्टिचीत करणे सोपे नसते. पण, जडेजाने ही किमया केली. लाबुशेन ज्या पद्धतीने खेळत होता, त्यावरून तो सामना भारताच्या हातातून हिसकावणार, असेच दिसत होते. पण, जडेजाने असे होऊ दिले नाही. जडेजाने सुमारे ६-८ महिन्यांनी पुनरागमन केले. आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याआधी तो रणजी स्पर्धेत खेळला आणि याचा त्याला मोठा फायदा झाला. अनेकांचे मत होते की, जडेजाला पहिल्या सामन्यात बसवून अक्षर पटेल किंवा कुलदीप यादवला खेळवले पाहिजे. पण, जडेजाने सर्वांना चुकीचे ठरवले. त्याने आपल्या अनुभवाच्या जोरावर सामन्याचे चित्रच बदलले. 

या खेळपट्टीवर २५०-३०० धावा काढणारा संघ सामन्यावर वर्चस्व मिळवेल. जर ऑस्ट्रेलियाने येथे २५०-२८० धावा केल्या असत्या, तर भारताला झुंजावे लागले असते. त्यामुळे, माझ्या मते आजचा हिरो ठरला तो रवींद्र जडेजा. स्मिथ-लाबुशेन यांनी ८२ धावांची भागीदारी केली आणि यावेळी भारतीय संघ हताश झाला होता. पण, जडेजाने ज्याप्रकारे भारताला पुनरागमन करून दिले, ते जबरदस्त होते. यानंतर ज्या खेळपट्टीवर कांगारूंची फलंदाजी कोसळली, त्याच खेळपट्टीवर रोहित शर्माने जबरदस्त फलंदाजी केली. या खेळपट्टीवर फलंदाजी कशी करावी हेच रोहितने दाखवून दिले. कारण, लोकेश राहुलही अपयशी ठरला आहे.

शुभमनला खेळवायला पाहिजे होते- पहिल्या कसोटीत माझ्या मते राहुलच्या जागी शुभमन गिलला खेळवायला पाहिजे होते. मर्यादित षटकांच्या सामन्यातील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सूर्यकुमार यादवला संघात स्थान मिळाले. राहुलला उपकर्णधारपदाचा फायदा झाल्याचे वाटते. परंतु, गिलला संघात हक्काने जागा मिळायला पाहिजी होती. त्याच्यासारख्या शानदार फॉर्ममध्ये असलेल्या युवा फलंदाजाला संघाबाहेर बसवणे योग्य वाटत नाही.

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारवींद्र जडेजाआर अश्विन
Open in App